राज्य मंत्रिमंडळात भ्रष्ट मंत्र्यांना काढून चांगल्या मंत्र्यांना संधी देण्याचे काम राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केले आहे. मात्र इतक्यावर न थांबता त्यांनी भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई होण्यासाठी गुन्हे दाखल केले पाहिजेत. अन्यथा मंत्रिमंडळात केवळ खांदेपालट झाल्यामुळे फारसा गुणात्मक फरक पडणार नाही, असे मत ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत बोलतांना व्यक्त केले.    
भाजपा अंतर्गत सुरू असलेल्या लालकृष्ण अडवाणी विरूध्द नरेंद्र मोदी यांच्यातील राजकारणाचा फायदा काँग्रेस पक्ष उठविण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका घेण्याची तयारी सुरू आहे, असे संकेतही त्यांनी दिले.     
ते म्हणाले, पाटबंधारे विभागामध्ये ७२ हजार कोटी रूपयांचा घोटाळा झाल्यानंतर त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली. त्याच्या अहवालामध्ये घोटाळा झाला असल्याचे सिध्द झाले होते. तरीही शासनाने आता आणखी एक समिती नेमली आहे. त्यावरून राज्य शासन याप्रश्नी चालढकल करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. तेलगी याने ६२ हजार कोटी रूपयांचा घोटाळा केला होता. त्याला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्याकडून ही रक्कम वसूल करतांना हयगय झाली होती. पाटबंधारे विभागाच्या घोटाळ्यातही असेच होण्याची शक्यता आहे.   सामाजिक न्याय विभागाच्या कोल्हापूर, सांगली विभागात औद्योगिक सहकारी संस्था उभारणीमध्ये ३०० कोटी रूपयांचा घोटाळा झाला आहे, असा आरोप करून आंबेडकर म्हणाले,की या घोटाळ्याच्या तपासणीत शासन चालढकल करीत आहे. चंद्रकांत हंडोरे हे या खात्याचे मंत्री असतांना हा घोटाळा झाला असल्याने त्यांची चौकशी झाली पाहिजे. याप्रश्नी शासनाने खुलासा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.    
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आपण स्वबळावर लढणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. ते म्हणाले, या निवडणुकीकरीता विविध २३ गट एकत्रित केले आहेत. या सर्वाना सोबत घेऊन निवडणुकीत यश मिळविण्याची तयारी सुरू आहे.

Story img Loader