संत जगमित्र सहकारी सूतगिरणीला दिलेल्या कर्जापैकी १ कोटी रक्कम उद्यापर्यंत (मंगळवार) जिल्हा बँकेच्या कॅश क्रेडिट खात्यात जमा करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. के. यू. चांदीवाल व न्या. ए.आय.एस. चिमा यांनी दिली. या प्रकरणात हस्तक्षेप अर्ज दाखल झाला होता. १५ दिवसांत रक्कम भरू, असे या सूतगिरणीचे अध्यक्ष पंडितअण्णा मुंडे व संचालक धनंजय मुंडे यांनी म्हटले होते. तथापि, ही रक्कम उद्याच भरावी, असे आदेश न्यायालयाने दिले. या प्रकरणी पुढील सुनावणी बुधवारी (दि. २३) होणार आहे.
काळे, सोनावणे यांचे जामीन अर्ज मागे
गेवराई येथील माउली सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष जयसिंग नानासाहेब काळे व व्यवस्थापक विठ्ठल उमाजी सोनावणे यांनी ६२ लाखांच्या फसवणूक प्रकरणात औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे. बीड जिल्हा बँकेने गेवराई पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार माउली सहकारी सूतगिरणीने घेतलेल्या ६२ लाखांच्या कर्ज प्रकरणातील कागदपत्रांची छाननी केली असता जिल्हा बँकेस फसवण्याच्या हेतूने विवरणपत्र दिले. अटी-शर्तीची पूर्तता केली असल्याचे नुसतेच भासविले. या दोन्ही आरोपींनी सुनावणीअंती अटकपूर्व जामीनअर्ज मागे घेतले.

Story img Loader