आज  धरणे आंदोलन
वीजबिलाची कमी वसुली केल्याचा ठपका ठेवत १५ ते २० कर्मचाऱ्यांवर एकतृतीयांश वेतन कपातीची कारवाई करण्यात आल्यामुळे शहर उपविभागीय वीज कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन करून वीज कंपनीच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. अधीक्षक अभियंत्यांना गुरुवारी घेराव घालण्यात आला.
वीज कंपनीने वीजबिल वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला वसुलीचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. त्याप्रमाणे वसुली न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. अशा कमी वसुली करणाऱ्या १५ ते २० कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्यात कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या, मात्र या कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेता ऑगस्टच्या वेतनात एकतृतीयांश रक्कम कपात करून घेतली. परंतु ही दंडात्मक कारवाई एकतर्फी केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांवर केला.
वसुली करताना काही लोक दाद देत नाहीत. त्यामुळे वसुलीचे प्रमाण घटू शकते, अशा ग्राहकांकडून वीजबिल वसुलीसाठी जनमित्रासोबत शाखा अभियंत्यांना पाठवावे. थकबाकी वसुलीबाबत होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊनच अशी दंडात्मक कारवाई व्हावी. यापुढे अधिकारी मनमानी पद्धतीने कामगारांची वेतनकपात चालू ठेवणार असतील, तर सर्व संघटना आंदोलन छेडतील, असा इशारा अधीक्षक अभियंता यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
शुक्रवारी शहर उपविभागातील वीज कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले. उद्या (शनिवारी) सर्व संघटनांचे वीज कर्मचारी धरणे आंदोलन करणार आहेत. धरणे आंदोलनात मागासवर्गीय कामगार संघटना, बहुजन फोरम, वर्कस फेडरेशन, इंटक कामगार महासंघ, वीज तांत्रिक कामगार संघटना वीजक्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, कामगार सेना सहभागी होणार आहेत.   

Story img Loader