सोलापूर महापालिकेच्या सर्व श्रेणीतील कर्मचा-यांना येत्या १ एप्रिल २०१४ पासून राज्य शासकीय कर्मचा-यांप्रमाणे वेतन दिले जाईल, अशी ग्वाही पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी दिली.
पालिका कामगार नेते अशोक जानराव यांच्या एकसष्टीनिमित्त त्यांचा सत्कार सोहळा पार पडला. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आयुक्त गुडेवार हे बोलत होते. राहुल युवक क्रीडा मंडळाने आयोजिलेल्या या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी महापौर अलका राठोड होत्या. याप्रसंगी पालिका कामगार शक्ती युनियनचे नेते जनार्दन शिंदे व सहायक कामगार आयुक्त मिलिंद जानराव यांचीही उपस्थिती होती. महापौर व आयुक्तांच्या हस्ते अशोक जानराव व त्यांच्या पत्नी सरोजिनी जानराव यांचा सत्त्कार करण्यात आला.
सोलापूर महापालिकेची प्रतिमा जनमानसात मलिन झाली असून, पालिकेचा कारभार सुधारला गेला तर ही प्रतिमा उजळू शकते. त्यासाठी पालिका कर्मचा-यांनी आपले कर्तव्य आणि जबाबदाऱ्या प्रामाणिक व चोखपणे पार पाडून सहकार्य करावे, अशी अपेक्षा गुडेवार यांनी व्यक्त केली. तर महापौर अलका राठोड यांनी सत्कारमूर्ती अशोक जानराव यांच्या सेवेचा मुक्तकंठाने गौरव करून महापालिकेची प्रतिमा उंचावण्यासाठी पालिका कर्मचा-यांनी मेहनत करण्याचे आवाहन केले. या वेळी अशोक जानराव यांनी सत्काराला उत्तर देताना गरिबीची जाणीव ठेवून व महापालिकेच्या हिताची कामे करून आणि कर्मचा-यांच्या हक्कासाठी आंदोलने करून विश्वासार्हता निर्माण केल्याने आपली वाटचाल यशस्वी झाल्याचे मनोगत मांडले.
या वेळी माकपचे नेते सिद्धप्पा कलशेट्टी, बसप्पाचे माजी नगरसेवक बबलू गायकवाड, काशिनाथ थोरात, अजित गायकवाड, प्रा. उमाकांत चनशेट्टी, पत्रकार दशरथ वडतिले, दीपक दोडय़ानूर आदींची भाषणे झाली. राहुल युवक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष कुणाल जानराव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रदीप जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा