उत्तर महाराष्ट्रात बहुतांश शेतकरी वीज ग्राहकांना महावितरणने छायाचित्र मीटर वाचन घेऊन योग्य देयक देण्याऐवजी अंदाजे अवास्तव देयक दिल्याने हे बेकायदेशीर आहे, अशा शेतकऱ्यांनी त्यांना देण्यात आलेले अंदाजे व अवास्तव देयक न भरण्याचे आवाहन नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीने केले आहे. ग्राहक पंचायतीने यासंदर्भात आंदोलनही सुरू केले असून, शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वीज वितरण कंपनीतर्फे घरगुती वीजदेयकांसाठी छायाचित्र मीटर वाचन घेऊन योग्य देयके देण्यात येतात. परंतु पाच वर्षांपासून कृषीपंपासाठी मीटर वाचन न घेताच अंदाजे व अवास्तव वीजदेयकांची आकारणी करण्यात येत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. यंदा नाशिक जिल्ह्य़ात जून ते सप्टेबर २०१३ या कालावधीत चांगला पाऊस झाला. त्यामुळे पिकाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना कृषीपंपांचा वापर करण्याची गरज भासली नाही. त्यामुळे बहुतेकांचे शून्य युनिट असतानाही सिन्नर भागात दोन हजार ते पाच हजार रुपये असलेली वीजदेयके, दरी-मातोरी भागात तीन हजार ते सहा हजार, दिंडोरी-निफाड तालुक्यात तीन हजार ते आठ हजार रुपये तर, जळगाव जिल्ह्यातील सावदा, फैजपूर, रावेर भागात १० हजार ते २० हजार रुपयांच्या कृषी वीजदेयकांचे महावितरणकडून वाटप करण्यात आले. बहुतांश देयकांची रक्कम अंदाजे सरासरीने वाढविली असल्याचेही ग्राहक पंचायतीने म्हटले आहे. वीजदेयके कायदा २००३ विभाग ४५ व परिपत्रक क्रमांक ५० नुसार अशी अवास्तव व बेकायदेशीर वीज देयके रद्द करून भरपाई मिळण्यास पात्र आहेत. या कायद्यातील तरतुदींनुसार योग्य मीटर वाचन करूनच देयकाची रक्कम ठरवली पाहिजे. ६ मे २००५च्या परिपत्रक क्रमांक १३६८५ नुसार सरासरी अंदाजे देयके बेकायदेशीर आहेत. तर परिपत्रक क्रमांक ५०नुसार अंदाजे देयक व प्रत्यक्ष वीजदेयक यातील फरकाची रक्कम मीटर वाचकाच्या पगारातून वगळून ग्राहकांच्या खात्यावर जमा करावी, अशी तरतूद असल्याची माहिती ग्राहक पंचायतीने दिली आहे.
शेतकऱ्यांना देण्यात आलेली अंदाजे व अवास्तव वीजदेयके त्यांनी भरू नयेत. तर, वीज कायदा २००३ विभाग ५६ नुसार त्यांनी योग्य व वास्तव देयक हक्क राखून भरावे, अंदाजे देयक रद्द करणे व त्याकरिता दरमहा ४०० रुपये भरपाई मिळण्यासाठी लोकपाल व्यवस्थेकडे तक्रार करावी. अशी तक्रार प्रलंबित असताना वीज कंपनीस वादग्रस्त देयकासंदर्भात वीजपुरवठा बंद करता येत नाही.
त्यामुळे कृषीपंप ग्राहकांनी ग्राहक पंचायतीच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन विलास देवळे, जगन्नाथ नाठे, एकनाथ दौंड, कृष्णा गडकरी, रामनाथ कदम आदींनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा