शिर्डीपासून देशभरातच नव्हेतर जगभरात अतिरेकी कारवाया, बॉम्बस्फोट, लढाया चालू आहेत. कुठेही शांतता नाही. अशा परिस्थितीत भगवान महावीरांनी सांगितलेल्या अहिंसा व शांततेचा संदेश आचरणात आणला तर जगभरात शांतता नांदेल असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी केले.
दिगंबर जैन समाजाच्या वतीने शिर्डीनजीक उभारण्यात आलेल्या ज्ञानतीर्थावर झालेल्या भगवान पाश्र्वनाथांच्या पंचकल्याणक महोत्सवास भुजबळ उपस्थित होते. या वेळी ते बोलत होते. प्रारंभी दुष्काळनिधीसाठी २ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश ज्ञानतीर्थाचे महामंत्री राजाभाऊ पाटणी यांनी भुजबळ यांच्याकडे सुपूर्द केला. महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, ज्ञानतीर्थाचे मठाधिपती स्वस्तिश्री रविकीर्ती (हस्तिनापूर), अखिल भारतीय जैन समाजाचे अध्यक्ष निर्मल सेठी, डॉ. पन्नालाल पापडीवाल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, राष्ट्रवादीचे बिपीन कोल्हे आदी उपस्थित होते.    
महसूलमंत्री थोरात, कृषिमंत्री विखे, खासदार वाकचौरे यांची या वेळी भाषणे झाली. या कार्यक्रमात नाशिक येथील विक्रीकर आयुक्त सुमेर काले यांनी त्यांचे वडील पन्नालाल काले यांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्ताने ८१ हजारांचा दुष्काळनिधी नामदार भुजबळ यांच्याकडे सुपूर्द केला.
पीठाधीश स्वस्तिश्री रवींद्र कीर्ती यांनी महाराष्ट्र शासनातील मंत्रिमहोदयांनी श्रीक्षेत्र मांगीतुंगी (नाशिक), श्रीक्षेत्र कचनेर (औरंगाबाद) येथे भाविकांना जाण्यासाठी रस्ते दळणवळण साधनांची उपलब्धता करून द्यावी, याचबरोबर नव्याने उभारण्यात आलेल्या ज्ञानतीर्थाकरिता तीर्थविकास व पर्यटनचा निधी देऊन या क्षेत्रांच्या विकासासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र काळे यांनी केले. महामंत्री राजाभाऊ पाटणी (नाशिक) यांनी आभार मानले.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा