सोलापूर शहरात उन्हाळा तापू लागला तसा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असताना पाण्याची बचत करण्याच्या हेतूने महापालिका प्रशासनाने शहराला एक दिवसाआडऐवजी दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे धोरण अमलात आणले आहे. मात्र पाण्याअभावी अक्षरश: नागरिकांचे हाल होत असल्याने त्याबद्दलच्या तीव्र प्रतिक्रिया आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागल्या आहेत. गुरुवारी महापालिकेसमोर पाणी प्रश्नावर बसपा व माकपच्या कार्यकर्त्यांनी पथनाटय़ासह धरणे आंदोलन केले.
बसपाचे पालिका गटनेते आनंद चंदनशिवे व माकपचे माशप्पा विटे यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या दोन्ही पक्षांच्या सहा नगरसेवकांसह बहुसंख्य स्त्री-पुरूष कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. हे आंदोलन सुरू असताना आयुक्त अजय सावरीकर हे पालिकेत फिरकले नव्हते.
दरम्यान, हे आंदोलन सुरूच असताना त्यात बुधवार पेठेतील कार्यकर्त्यांचे कलापथक दाखल झाले. या कलापथकाने पाण्याच्या प्रश्नावर पथनाटय़ सादर केले. पाणी प्रश्नावर पालिकेचे पदाधिकारी व प्रशासन कसे असंवेदनशील व निष्क्रिय आहे, त्यामुळे नागरिकांचे विशेषत: महिला व लहान मुलांचे कसे हाल सुरू आहेत, याकडे लक्ष वेधण्यासाठी हे पथनाटय़ सादर करण्यात आले. या कलापथकात शाहीर आबा कांबळे, प्रशांत रणदिवे आदी कलावंत कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता. हे पथनाटय़ पाहण्यासाठी नागरिकांबरोबच महापालिकेतील कर्मचाऱ्यांनीही आपली कामे बाजूला ठेवून गर्दी केली होती.

Story img Loader