डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांचा उपद्रव आणखी वाढला आहे. कल्याण-डोंबिवली ही दोन्ही स्थानके फेरीवाल्यांसाठी आश्रयस्थाने म्हणून ओळखली जातात. रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांचा उपद्रव कमी व्हावा, यासाठी महापालिकेच्या प्रभाग कार्यालयाने या भागात खास टेहळणी पथके तयार केली आहेत. या पथकांमार्फत सकाळ-सायंकाळ या भागात टेहळणी केली जाते. असे असले तरी या परिसरात फेरीवाल्यांचा उपद्रव वाढू लागल्याने रहिवाशांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक निवडून आले आहेत. या सगळ्या परिसरात मोठय़ा संख्येने फेरीवाल्यांचा उपद्रव आहे. असे असताना महापालिकेच्या अनागोंदीविरोधात मंगळवारी मनसेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या मोर्चामध्ये फेरीवाल्यांच्या ऊपद्रवाचा मुद्दा वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कामत मेडिकल पदपथावरील फेरीवाले ही नागरिकांची मोठी डोकेदुखी असते. कामत मेडिकल, उर्सेकर वाडी, नेहरू रस्ता, राजाजी रस्ता, रॉथ रस्त्यावरील फेरीवाल्यांची संख्या दररोज वाढू लागली आहे. फेरीवाल्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी खास पथके तयार करण्याची घोषणा मध्यंतरी महापालिकेने केली होती. रेल्वे स्थानक परिसरात प्रभाग कार्यालयमार्फत यासाठी खास पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांनी दिवसा-रात्री टेहळणी करून फेरीवाल्यांना रोखावे, असे ठरले आहे. ठरल्याप्रमाणे टेहळणी होते, तरीही कारवाई होत नसल्याचे चित्र दिसू लागले आहे. स्थानिक नगरसेवक याविषयी ‘ब्र’ काढत नसल्याने महापालिका कर्मचाऱ्यांचे ‘भले’ होते, अशी चर्चा रंगली आहे. फेरीवाला हटाव पथकाचे नियंत्रक या सगळ्या प्रकाराकडे कानाडोळा करीत असल्याने स्थानिक अधिकारी उदासीन असतात. त्याचा नागरिकांना नाहक त्रास होतो, असे नागरिकांकडून सांगण्यात येते.
डोंबिवली स्थानक परिसरात फेरीवाल्यांची अरेरावी सुरूच
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांचा उपद्रव आणखी वाढला आहे. कल्याण-डोंबिवली ही दोन्ही स्थानके फेरीवाल्यांसाठी आश्रयस्थाने म्हणून ओळखली जातात.
First published on: 12-08-2014 at 06:55 IST
TOPICSफेरीवाले
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Peddlers in dombivali