ठाणे, डोंबिवली आणि कल्याण या मोठय़ा गर्दीच्या स्थानकांमध्ये फेरीवाल्यांचा प्रचंड उच्छाद असून ही स्थानके फेरीवाल्यांच्या फेऱ्यात अडकली आहेत. स्थानकावरील मोक्याच्या जागांवर या फेरीवाल्यांनी आपले दुकाने थाटली असल्याने रेल्वे स्थानकात येणे-जाणे जिकिरीचे बनले आहे. गर्दीतून वाट काढत जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. स्थानकात जाणाऱ्या रस्त्यांची ही स्थिती असताना नव्याने बांधण्यात आलेले सॅटिस आणि स्कायवॉकही या फेरीवाल्यांच्या तावडीतून सुटलेले नाहीत. रेल्वे अधिकाऱ्यांच्या स्थानक भेटीच्या दरम्यान हे फेरीवाले अचानक गायब होत असले तरी अधिकाऱ्यांची पाठ फिरली की मात्र त्यांच्या व्यवसायाला तेजी येते. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दल आणि पोलिसांचे फेरीवाल्यांना असलेले संरक्षण यानिमित्ताने आधोरेखित होते. तक्रार करण्यासाठी गेलेल्या प्रवाशांनाच अधिकारी ‘तुमचा त्रास वाचवण्यासाठीच हे फेरीवाले व्यवसाय करतात ना?’ असे प्रश्न विचारून धारेवर धरतात. पोलीस प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दलाचे असे पाठबळ मिळत असल्याने फेरीवाल्यांची गुंडगिरी वाढली असून प्रवाशांवर हल्ला करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये फेरीवाल्यांची प्रचंड दहशत असल्याचा आरोप प्रवासी संघटना करू लागल्या आहेत.
ठाण्यातील ‘फेरीवाला मुक्ती’ तात्पुरती – फेरीवाल्यांच्या कोंडाळ्यात सदैव सापडलेल्या ठाणे रेल्वे स्थानकाने शुक्रवारी सकाळी मात्र मोकळा श्वास घेतला. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या पुढाकाराने रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकेश निगम यांचा दौरा आयोजित करण्यात आल्याने शुक्रवारी पहाटेपासूनच फलाट, पादचारी पूल अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू करण्यात आली. त्यामुळे गर्दीच्या वेळेत लोकल पकडण्याच्या घाईत असणाऱ्या चाकरमान्यांना सुखद धक्का बसला. मात्र, व्यवस्थापक दौरा संपून अर्धा तास उलटत नाही तोच सॅटिसपासून पादचारी पुलापर्यंत स्थानकाच्या प्रत्येक कोपऱ्यावर फेरीवाल्यांचे बस्तान पुन्हा बसल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
ठाणे स्थानकाच्या पश्चिमेकडील सॅटिसच्या खाली असलेल्या मोकळ्या जागेचा फेरीवाल्यांनी केव्हाच ताबा घेतला आहे. रेल्वे फलाटांच्या दिशेने जाणाऱ्या दोन्ही पादचारी पुलांवर मोठय़ा प्रमाणावर फेरीवाले दिसून येतात. सॅटिसचा परिसर ठाणे महापालिकेच्या हद्दीत येतो तर स्थानकाच्या आतील परिसर रेल्वेच्या हद्दीत मोडतो. त्यामुळे फेरीवाल्यांवर कुणी कारवाई करायची यावरून या दोन्ही प्रशासनामध्ये नेहमीच वाद सुरू असतो. ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी आर.ए.राजीव असताना त्यांनी सॅटिसवरील फेरीवाल्यांविरोधात कडक मोहीम हाती घेतली होती. विद्यमान आयुक्त असीम गुप्ता यांच्या कार्यकाळात मात्र या ठिकाणी फेरीवाल्यांना मोकळे रान मिळाल्याचे चित्र आहे. शुक्रवारी मात्र हे चित्र काहीसे पलटलेले दिसले. मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकेश निगम यांचा पूर्वनियोजित दौरा असल्याने या भागातील रेल्वे सुरक्षा दलाने सकाळपासूनच कडक बंदोबस्त ठेवला होता. दुपारच्या सुमारास ठाणे स्थानकात आलेल्या व्यवस्थापकांची ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी भेट घेतली आणि येथील फेरीवाल्यांचा उपद्रव त्यांच्या कानावर घातला. रेल्वेसंदर्भात येणाऱ्या तक्रारींपैकी सुमारे ८० टक्के तक्रारी फेरीवाल्यांच्या त्रासाच्या असून त्याकडे रेल्वे सुरक्षा दलांचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विचारे यांनी यावेळी केला. यावेळी उपस्थित असलेल्या एका प्रवासी महिलेने आपण फेरीवाल्यांच्या विरोधात आवाज उठवल्यामुळे आपल्यावरच हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची व्यथा निगम यांच्यासमोर मांडली. त्यावेळी यापुढे ठाणे स्थानक परिसरात फेरीवाल्यांवर तात्काळ कारवाई केली जाईल, तसेच अशा तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली जाईल, असे आश्वासन रेल्वे प्रशासनाच्या विभागीय व्यवस्थापकांनी दिले. मात्र खासदार आणि विभागीय व्यवस्थापकांचा दौरा आटोपताच काही मिनिटातच पुन्हा एकदा फेरीवाल्यांचे जथ्थे स्थानकाच्या दिशेने येत असल्याचे चित्र दिसले. जणू काही झालेच नाही अशा आविभार्वात सायंकाळपर्यंत फेरीवाल्यांनी आपली दुकाने या ठिकाणी थाटली होती.
डोंबिवलीतही फेरीवाले मोकाट
डोंबिवली स्थानकात येण्यासाठी उपलब्ध असलेले सर्वच रस्ते अरुंद असून रस्त्याच्या कडेने चालण्यासाठी पदपथही उपलब्ध नाहीत. स्थानकाकडे येणाऱ्या पदपथांचा ताबा फेरीवाल्यांनी कैक वर्षांपूर्वीच घेतला असून त्यांना हटवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न होत नाहीत. पालिकेच्या वतीने फेरीवाले हटवण्यासाठी कारवाई केली जात असली तरी अधिकाऱ्यांची पाठ फिरल्यानंतर फेरीवाल्यांचा उपद्रव पुन्हा सुरू होतो. डोंबिवली स्थानक परिसरामध्ये पूर्वेकडे रामनगर, टिळकनगर ही दोन महत्त्वाची पोलीस ठाणी तर पश्चिमेला विष्णूनगर पोलीस ठाणे आहे. रेल्वे पोलिसांचेही संरक्षण डोंबिवली स्थानकाला मिळते. मात्र या चारही पोलीस ठाण्यांमध्ये फेरीवाल्यांच्या त्रासाच्या तक्रारी केल्या जात असल्या तरी पोलीस प्रशासन पालिकाच त्यावर कारवाई करेल, अशी भूमिका घेत असल्याने फेरीवाल्यांमध्ये पोलिसांची भीती राहिलेली नाही.
फेरीवाल्यांचेच कल्याण
कल्याण शहराच्या विविध भागांतून रेल्वे स्थानकात जाण्यासाठी एमएमआरडीएच्या वतीने बांधण्यात आलेला सॅटिस स्कायवॉक मुंबई परिसरातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वापर असलेला स्कायवॉक आहे. स्कायवॉक हे फेरीवाल्यांचे हक्काचे ठिकाण बनले आहे. सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत महिलांच्या बॅग्ज, गॉगल्स, घडय़ाळ, पायरेटेड पुस्तक विक्रेते, मोबाईलचे साहित्य, खेळणी विक्रेते यांचा येथे राबता असतो. त्याचप्रमाणे भाजीवालेही या स्कायवॉकवर आपला व्यवसाय थाटतात. मध्यरात्रीनंतर या स्कायवॉकवर भिकारी, गर्दुल्ले यांचा वावर वाढतो. एमएमआरडीएने बांधलेला हा स्कायवॉक महापालिकेच्या आधिपत्याखाली येत असून तेथील फेरीवाल्यांना हटवणे महापालिकेची जबाबदारी असताना महापालिका प्रशासन मात्र या फेरीवाल्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते. या संदर्भात महापालिकेकडे तक्रारी केल्यास त्यावरील फेरीवाल्यांना हटवण्यासाठी एमएमआरडीएला माहिती देऊ अशी उत्तरे मिळतात, असा प्रवासी संघटनांचा अनुभव आहे. स्थानिक पोलीस व रेल्वे पोलिसांमध्ये हद्दीचा वाद असल्याने पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी या भागात फिरकतही नाहीत. त्यामुळे स्कायवॉक हे फेरीवाल्यांसाठी आंदण दिल्याचे चित्र आहे. स्थानकामध्ये फिरत्या जिन्याच्या उद्घाटनप्रसंगी रेल्वे प्रशासनाने स्कायवॉकवरील फेरीवाल्यांवर चाप बसवण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाला बजावले होते. मात्र त्यांच्याकडूनही थंड प्रतिसाद असल्याने शहरातील सुमारे दीड लाखांहून अधिक प्रवाशांना या स्कायवॉकवरील फेरीवाल्यांचा फटका सहन करावा लागतो तर स्कायवॉकच्या खालची स्थितीही तितकीच गंभीर असून तेथे फळे, भाज्या, फुले आणि सरबतवाल्यांचा कब्जा आहे तर इतर मोकळ्या जागेत रिक्षावाल्यांचा उपद्रव आहे.
रेल्वे स्थानक परिसरास फेरीवाल्यांचा विळखा !
ठाणे, डोंबिवली आणि कल्याण या मोठय़ा गर्दीच्या स्थानकांमध्ये फेरीवाल्यांचा प्रचंड उच्छाद असून ही स्थानके फेरीवाल्यांच्या फेऱ्यात अडकली आहेत.
First published on: 11-11-2014 at 06:13 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Peddlers near railway station area