नियोजनबद्ध नवी मुंबई शहरातील बहुतांश पदपथांना फेरीवाल्यांनी विळखा घातला आहे. पादचाऱ्यांना चालण्यास पदपथ मोकळे राहिलेले नाहीत. शहरात ८० हजारांपेक्षा जास्त फेरीवाल्यांनी ७० टक्के पदपथ गिळंकृत करून टाकले आहेत, तरीही पालिका प्रशासनाची हाताची घडी तोंडावर बोट असल्याचे चित्र सध्या नवी मुंबईत पाहावयास मिळत आहे.
पादचाऱ्यांना विनाअडथळा प्रवास करता यावा यासाठी नवी महानगरपालिकेकडून गेल्या वीस वर्षांत करोडो रुपये खर्च करून पदपथ तयार केले गेले आहेत. मात्र नवी मुंबईतील हेच पदपथ फेरीवाल्यांसाठी व्यवसाय करण्याचे हक्काचे ठिकाण बनले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना पदपथावरून मार्गक्रमण करणे जिकिरीचे झाले आहे. नगरसेवकांच्या आशीर्वादानेच काही ठिकाणी पदपथावर फेरीवाले बसलेले आहेत. पदपथावर बसलेल्या या फेरीवाल्यांवर महानगरपालिकेकडून कारवाई केली असता नगरसेवकच फेरीवाल्याचे सामान देण्यासाठी पालिकेच्या आधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा अनुभव आहे. पदपथावरील फेरीवाल्यांसंदर्भात पालिकेत नगरसेवक दाखविण्यासाठी आवाज उठवत असले तरी त्यांच्याच आशीर्वादाने पदपथावर फेरीवाल्यांनी कब्जा केलेला दिसून येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका रस्तेबांधणीप्रमाणे नवीन पदपथ तयार करणे व जुन्या पदपथांची दुरुस्ती करण्यावर दरवर्षी करोडो रुपये खर्च करत आहे. पालिकेने आतापर्यंत सुमारे एक हजार कोटी रुपये या सेवेवर खर्च केल्याचा अंदाज आहे. सुस्थितीत असलेल्या पदपथांची कामे काढून त्यात लाखो रुपयांचा मलिदा कमविण्याची नगरसेवक व अधिकाऱ्यांची मोडस ऑपरेंडी गेली कित्येक वर्षे सुरू आहे. त्यामुळे पालिकेत मध्यंतरी पदपथ घोटाळ्यांची चर्चा होत होती. पादचाऱ्यांना चालण्याच्या उद्देशाने ही सुविधा तयार केली असली तरी सद्य:स्थितीमध्ये शहरातील ७० टक्के पदपथांचा वापर पादचाऱ्यांना चालण्यासाठी होत नाही. पदपथावरील झाकणे गायब झाल्याने पादचाऱ्यांना रस्त्याने चालणे कठीण झाले आहे. अंधारात पदपथावरील गटारात पडण्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. वाशी बस डेपो ते सेक्टर ९ मध्ये फेरीवाल्यांनी मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण केले असून सायंकाळी येथून चालणे मुश्कील होते. एपीएमसीजवळील पदपथांचीही परिस्थिती सारखीच आहे. माथाडी भवनमध्ये परिसरामध्ये दुकानदारांनी पदपथावर अतिक्रमण केले आहे. मसाला मार्केटजवळील सव्र्हिस रोडवर पदपथावर भाजी व फळविक्रेत्यांनी बस्तान मांडले आहे. कोपरी गाव येथे पदपथावर वाहने उभी केली जात आहेत. ऐरोली रेल्वे स्टेशन परिसरात पदपथावर रिक्षाचालकांनी अनधिकृतपणे रिक्षा स्टॅण्ड उभारले आहेत. नेरुळ रेल्वे स्टेशनसमोर पूर्ण पदपथ सायंकाळी भाजी व मासेविक्रेत्यांनी व्यापलेला असतो. नेरुळ सेक्टर २० मध्ये गॅरेज व हॉटेल, मटण विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. तुभ्रे नाका येथे मटण विक्रेत्यांनी पूर्ण पदपथ गिळंकृत केला आहे. रबाले रेल्वे स्थानकासमोरील भुयारी मार्गाजवळील पदपथावर फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहे. ठाणे बेलापूर मार्गावरील तुभ्रे नाक्यावर पदपथावर फेरीवाल्यांनी उच्छाद मांडला आहे. पदपथावर फेरीवाले बसत असून रस्त्यावरदेखील वाहने लावण्यात येत आहेत, त्यामुळे रस्त्याने चालणे कठीण होत असून पदपथांवर फेरीवाले बसत असल्यामुळे नाइलाजास्तव रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे चेनस्नॅचिंगचे प्रकार घडतात, असे प्राजक्ता काळे म्हणाल्या. तर नवी मुंबई हॉकर्स युनियनचे अध्यक्ष प्रफुल्ल म्हात्रे म्हणाले की, नवी मुंबईतील फेरीवाल्यांना न हटवता त्यांना अधिकृत करून घ्यावे, अशी आमची मागणी आहे. फेरीवाला धोरणानुसार फेरीवाल्यांना बसवण्यासाठी अधिकृत जागा उपलब्ध करून द्या, या संदर्भात आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याशी चर्चा सुरू आहे.
नियोजनबद्ध शहरात फेरीवाल्यांकडून पदपथ गिळंकृत
नियोजनबद्ध नवी मुंबई शहरातील बहुतांश पदपथांना फेरीवाल्यांनी विळखा घातला आहे.
First published on: 14-04-2015 at 06:40 IST
TOPICSफेरीवाले
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Peddlers on footpath