चेंबूर ते वडाळा या टप्प्यात धावत असलेल्या मोनोरेलचा वापर वाढावा यासाठी मोनोरेल आणि उपनगरी रेल्वेस्थानकांना जोडणारे स्कायवॉक-पादचारी पूल बांधण्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतले आहे. नोव्हेंबर २०१५ पर्यंत हे काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे. वडाळा ते संत गाडगेमहाराज चौक हा मोनोरेलचा दुसरा टप्पा जानेवारी २०१६ पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा असून त्यानंतर चेंबूर-वडाळा-संत गाडगेमहाराज चौक या १९ किलोमीटर लांबीच्या मार्गावर धावणारी मोनोरेल सुरू झाल्यानंतर चेंबूर ते महालक्ष्मी रेल्वेस्थानकाचा टप्पा जोडला जाणार असून प्रवाशांना पूर्व-पश्चिम प्रवास करणे सुकर होईल, अशी अपेक्षा आहे.
मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत नवीन पर्व सुरू करणाऱ्या मोनोरेलला सोमवार, २ फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण झाले. रोज ३६ हजार ३५२ प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असताना अवघे १३ ते १४ हजार प्रवासीच मोनोचा वापर करत असल्याने मोनोराणीचा तोटा वर्षभरात सुमारे १७ ते १८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मोनोरेलचा दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर चेंबूर ते महालक्ष्मी स्थानकापर्यंतचा परिसर जोडला जाणार आहे. त्यानंतर रोज सुमारे ३० हजार प्रवासी मोनोरेलमधून प्रवास करतील, असा प्राधिकरणाचा अंदाज आहे. चेंबूर ते वडाळा या ८.९ किलोमीटर लांबीच्या मार्गावर मोनोरेल २ फेब्रुवारी २०१४ पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. आता वडाळा ते महालक्ष्मी स्थानकाजवळील संत गाडगेमहाराज चौक या १०.२४ किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे. तो पूर्ण झाल्यावर १९.५ किलोमीटर लांबीचा चेंबूर ते संत गाडगेमहाराज चौक हा मोनोरेल मार्ग पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी उपलब्ध होईल. मोनोरेल आणि उपनगरी रेल्वेची स्थानके एकमेकांशी जोडली गेल्यास प्रवाशांना लाभ होईल, शिवाय मोनोरेलची प्रवासी संख्याही त्यामुळे वाढेल अशी अपेक्षा आहे. त्यासाठी चेंबूर, भक्ती पार्क, वडाळा, आंबेडकरनगर, लोअर परळ आणि संत गाडगेमहाराज चौक ही मोनोरेलची स्थानके उपनगरी रेल्वेशी जोडण्यात येणार आहेत. त्यासाठी स्कायवॉक-पादचारी पुलांचे काम हाती घेण्यात आले आहे. संत गाडगेमहाराज चौकातील पुलामुळे महालक्ष्मी रेल्वेस्थानक मोनोरेलशी जोडले जाईल, तर करी रोड मोनोरेल स्थानक लोअर परळ रेल्वेस्थानकाशी जोडले जाईल. हार्बर मार्गावरील उपनगरी रेल्वे व वडाळा मोनोरेल स्थानक यांना जोडणारा एक पूल असेल. आंबेडकरनगर मोनोरेल स्थानकावरून टाटा रुग्णालय, केईएम रुग्णालय, वाडिया रुग्णालय या ठिकाणी जाण्यासाठी एक पादचारी पूल बांधण्यात येत आहे. सध्या चेंबूर-वडाळा मोनोरेल मार्गावर सात स्थानके असून वडाळा-संत गाडेगमहाराज चौक या दुसऱ्या टप्प्यात १० स्थानके असतील.

Story img Loader