लांब पल्ल्याच्या अवजड वाहनांमध्ये अधिक साहित्य भरून नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या अवजड वाहन चालकांविरोधात कल्याणच्या ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांनी वाहन जप्ती आणि दंड वसुलीची मोहीम सुरू केली आहे. कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली, अंबरनाथ परिसरातील ४० अवजड वाहनांवर कारवाई करून कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी कारवाई करून ८ लाख ६४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
ज्या अवजड वाहनचालकांनी दंड भरण्यास नकार दिला आहे, त्यांची वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात आणून दंड भरण्यात येत नाही तोपर्यंत जप्त करण्यात आली आहेत. नाशिक, अहमदाबाद, मुंबई, कर्नाटक, गुजरात येथून राज्याच्या विविध भागांत जाणारी बहुतांशी मालवाहू अवजड वाहने कल्याण शहर परिसरातून जातात. अनेक वाहनांची माल वाहून नेण्याची क्षमता नसताना त्यामध्ये वाढीव माल भरला जातो. हा भार पेलवला जात नसल्याने अनेक वेळा वाहनांना अपघात होतात. अपघातानंतर हे प्रकार उघडकीला येतात. त्यामुळे दुर्घटना घडण्यापूर्वीच संबंधित अवजड वाहनावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे साहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेश सरक यांनी सांगितले. ‘आरटीओ’ अधिकारी शेळके यांच्या पथकाने डोंबिवली एमआयडीसी, दुर्गाडी रस्ता, उल्हासनगर, अंबरनाथ भागातून अशी अवजड वाहने जप्त केली आहेत, असे ते म्हणाले. अवजड वाहनाचे वजन करून त्यामध्ये वाढीव माल असेल तर तो तात्काळ उतरण्यास भाग पाडले जाते, असे सरक यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा