कराड तालुक्याच्या उत्तरपूर्व भागात वरदायी ठरणाऱ्या हणबरवाडी-धनगरवाडी या महत्त्वपूर्ण योजनेसह सातारा जिल्ह्यातील इतर रखडलेल्या योजनांच्या पूर्ततेसाठी केंद्र शासनाकडून ६० हजार कोटी व राज्य शासनाकडून १५ हजार कोटींची मागणी करून जिल्ह्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपला पाठपुरावा राहील. केंद्र व राज्य शासनाने त्यासाठी सकारात्मक पावले उचलली असल्याचे सांगताना, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हणबरवाडी-धनगरवाडी योजनांसंदर्भात विशेष बैठक घेऊन ही योजना मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. रखडलेल्या पाणी योजनेबाबत विशेष बैठक घेऊन या योजना त्वरित मार्गी लावू अशी ग्वाही जलसंपदामंत्री व पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी दिली.
शशिकांत शिंदे यांनी सह्याद्री सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील दिवंगत लोकनेते पी. डी. पाटील यांच्या पुतळय़ास पुष्पहार घालून अभिवादन केले. यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आमदार बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अरुणादेवी पिसाळ, कराड पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील, कराड उत्तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंगराव जगदाळे, नितीन भरगुडे-पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजयमाला जगदाळे, मेघना चव्हाण, प्रशांत यादव, सह्याद्री साखर कारखान्याचे सर्व संचालक, अधिकारी वर्ग व  कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
कोरेगाव तालुक्यातील ६ आणि कराड उत्तरच्या पूर्व भागातील २२ अशा एकूण २८ गावांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटविण्यासाठी हणबरवाडी-धनगरवाडी ही योजना मार्गी लागणे महत्त्वाचे आहे. गेली अनेक वष्रे श्रेयवादात व अनुशेषाअभावी ही योजना रखडली आहे. आपल्या काळात तरी ही योजना मार्गी लागेल का, या प्रश्नावर शशिकांत शिंदे बोलत होते. मात्र, योजनेच्या श्रेयवादाबाबत शिंदे यांनी बोलणे टाळले. यावर बाळासाहेब पाटील म्हणाले, की ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांच्या काळापासून या योजनेसाठी सातत्याने कोण पाठपुरावा करतो आहे हे जनतेला माहीत आहे. त्यासाठी वेगळे सांगण्याची गरज नाही. श्रेयवाद कशाला? पाठपुरावा आम्हीच करत आहोत. विरोधक फक्त भांडवल करतात.
सह्याद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष व आमदार बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्री कारखान्याच्या कामकाजाबद्दल शशिकांत शिंदे यांना माहिती दिली. या वेळी कारखान्याच्या संचालकांनी तसेच कार्यकर्त्यांनी शिंदे यांचे स्वागत आणि सत्कारही केला.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा