वाशीत सोमवारी मसाज सेंटरमध्ये मसाजसाठी आलेल्या तरुणीला तेथे आलेल्या एका ग्राहकाने निर्वस्त्र पाहिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे तरुणीच्या संतापलेल्या नातेवाइकांनी सेंटरची तोडफोड करीत त्या व्यक्तीला चोप दिला. 

या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात विनयभंगांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेने मसाज सेंटर चालकांकडून नियम धाब्यावर बसविण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे. वाशी सेक्टर १२ येथे असलेल्या या सेंटरमध्ये सोमवारी संध्याकाळच्या वेळेस २९ वर्षीय पीडित तरुणी मसाज करून घेण्यासाठी आली होती. यावेळी निर्वस्त्र असताना त्या केबिनमध्ये एका पुरुष ग्राहकाने प्रवेश केला होता. यावेळी तरुणीने केलेल्या आरडाओरडीमुळे तो बाहेर निघून गेला. या प्रकाराची माहिती तरुणीने घरच्यांना फोन करून दिली. तिच्या घरच्यांनी सेंटरमध्ये धाव घेत, सेंटरची तोडफोड करीत त्या ग्राहकाला चांगलाच चोप दिला. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मसाज सेंटर चालकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणीच्या नातेवाइकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नवी मुंबई शहरामध्ये सुरू असलेल्या मसाज सेंटरमध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन सुरू असल्याचे पाहायला मिळते. अनेक सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली गैरधंदे सुरू असल्याचे यापूर्वीच्या कारवाईतून समोर आले आहे. गैरधंद्यांचे अड्डे बनू पाहणाऱ्या या सेंटरवर पोलिसांचादेखील वचक नसल्याने त्यांचे जाळे विस्तारत आहे.

 

Story img Loader