उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सार्वजनिक दहीहंडी उत्सवातील वाढत्या आक्रस्ताळेपणाला चांगलीच वेसण बसली असून सर्वसामान्य नागरिकांचा जीव भांडय़ात पडला आहे. गेली अनेक वर्षे तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करणारे उत्सवग्रस्त नागरिकही उघडपणे या काळात त्यांना होणारा त्रास सांगू लागले आहेत.
सार्वजनिक उत्सवाचा त्रास मूठभरांनाच होतो, असा दावा करणाऱ्यांनी आमच्या परिसरात उत्सवाच्या दिवशी राहून पाहा, मग त्यांना परिस्थितीचे भान येईल, असे आव्हान दिले आहे. दहीहंडीच्या काळात आमच्या परिसरामध्ये अक्षरश: आणीबाणीची परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे आमच्या रोजच्या व्यवहारांवर मर्यादा तर येतातच परंतु पाळीव प्राण्यांना तर या भागातून पूर्णपणे स्थलांतरितच करावे लागते. ‘त्यांचा होतो खेळ.. आणि आमची होते कोंडी’ अशा संतप्त प्रतिक्रिया पाचपाखाडी परिसरातील सोसायटय़ांमधून उमटू लागल्या आहेत.
ठाण्यातील पाचपाखाडी परिसरामध्ये साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवामुळे या परिसरातील नागरिकांना आपल्याच घरात कोंडून घ्यावे लागते. कारण त्यांचे बाहेर जाण्याचे मार्गच त्या दिवशी बंद असतात. अगदी उपचारांसाठी रुग्णालयात जाणेही शक्य होत नाही. दोन वर्षांपूर्वी या परिसरातील प्रदीप सोसायटीत राहणाऱ्या एका गृहस्थांना तर ठाण्यात निधन पावलेल्या नातेवाईकांच्या अन्त्ययात्रेसही जाता आले नाही. त्या नातेवाईकांचे घर पाचपाखाडीपासून अगदी जवळ म्हणजे फॉरेस्ट नाका येथे होते. तरीही त्यांना घराबाहेर पडून तिथे पोहचता आले नाही.
दहीहंडीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांची कशी कोंडी होते, याचे हे ठळक उदाहरण आहे. कित्येक तास डीजेचा ढणढणाट छातीत धडकी भरवत असतो, तर आजूबाजूच्या रस्त्यांवर उभ्या असलेल्या जनरेटर्स व्हॅन्सचा आवाज आणि धुराच्या लोटामुळे खिडक्या उघडण्याचीही सोय नसते. चॅनल्सच्या ओबी व्हॅन्स आणि जनरेटरच्या धडधडटीचीही त्यात भर पडते. गेल्या दहा वर्षांपासून ही परिस्थिती जैसे थे अशीच असून उलट वर्षांनुवर्षे त्रास वाढत आहे. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या निर्देशामुळे या भागातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून या निर्णयाचे स्वागत केले आहे.
पाळीव प्राण्यांना येऊरचा आसरा..
दहीहंडी उत्सवानिमित्त होणाऱ्या या कर्णकर्कश्श गोंधळापासून दूर जाण्यासाठी अन्य ठिकाणी सहलीला जाण्याचा पर्याय या भागातील नागरिक पत्करू लागले आहेत.
डीजेंच्या आवाजामुळे प्राण्यांच्या वागण्यात प्रचंड चलबिचल निर्माण होत असून काही वेळा कुत्रे खाणेपिणेही सोडतात. त्यामुळे पाळीव प्राण्यांना येऊर परिसरातील सुरक्षित भागामध्ये पाठवण्यात येत असल्याचे या भागात राहणाऱ्या वैशाली आपटे यांनी सांगितले. माणसापेक्षा प्राण्यांमध्ये ध्वनी ग्रहण करण्याची क्षमता कैकपट अधिक असते. ध्वनिप्रदूषणामुळे प्राण्यांच्या वर्तनामध्ये प्रचंड बदल होतात. अनेक प्राणी घाबरून खाणे, पिणे बंद करतात. आडोशाला जाऊन दडून बसतात. काही प्राणी अचानक आक्रमक होऊन हल्लासुद्धा करतात. उत्सवांच्या काळात वाढलेल्या ध्वनिप्रदूषणामुळे त्रास होणाऱ्या प्राण्यांच्या मालकांचे फोन येत असून या काळात हे प्राणी शांत राहण्यासाठी आम्ही काही औषधेही कुत्र्यांना देतो. माणसापेक्षा प्राण्यांना होणाऱ्या त्रासाची तीव्रता अधिक असते.
मात्र मुक्या प्राण्यांना हा त्रास नीट सांगताही येत नाही. घरातील पाळीव मांजर, फिशटँकमधील मासे यांच्या वागण्यातसुद्धा ध्वनिप्रदूषणामुळे मोठा परिणाम होतो. झाडावरील पक्षी असो अथवा अन्य प्राणी त्यांनाही त्रास होत असल्यामुळे ध्वनिप्रदूषण होत असलेल्या भागामध्ये जाणेच असे प्राणी टाळतात, पक्षी घरटी सोडून देतात, अशी माहिती ठाण्यातील प्राणितज्ज्ञ डॉ. जया चारियार यांनी दिली.
नागरिक नव्हे आयोजक मूठभर
उत्सवाच्या काळात ध्वनिप्रदूषणाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी करणाऱ्या दक्ष नागरिकांची उत्सवांचे आयोजक ‘मूठभर लोक’, ‘विघ्नसंतोषी’ म्हणून निर्भर्त्सना कराताना दिसतात. मात्र अशा बाधित परिसरात राहणाऱ्या प्रत्येकालाच ध्वनिप्रदूषणाचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. अशा नागरिकांची संख्या लाखोंच्या घरात आहे.
मात्र त्यातील एखादाच दक्ष नागरिक या धटिंगणांविरोधात आवाज उठवून पोलिसांकडे तक्रारीचा फोन करतो आणि मग तो रोषाचा बळी ठरतो.
खरे तर धिंगाणा घालणारे मूठभरच संपूर्ण शहरात वेठीस धरीत असतात, असे मत पाचपाखाडीतील प्रदीप सोसायटीतील जेष्ठ नागरिक नारायण काळे यांनी व्यक्त केले आहे.
आवाज विवेकाचा, इथे तक्रार कुणाकडे करायची?
दहीहंडी ग्लोबल करण्याच्या नादात येथल्या आयोजकांनी कायद्याची पायमल्ली केली असून त्यांच्या संरक्षणासाठी पोलिसांचा बंदोबस्तही उपलब्ध असतो. हे पोलीस आमचीच आडवणूक करतात. वळसा घालून घरी जाण्यास सांगत असतात. सुरुवातीला पोलिसांकडे तक्रारी करत होतो. मात्र सध्या राजकारणात अत्यंत सक्रिय असलेलेच लोक या धिंगाण्याच्या आयोजनात सक्रिय असल्याने आमचा आवाज चिरडून टाकला जातो. त्यामुळे तक्रार कुठे करायची, असा प्रश्न निर्माण होतो, असे या भागातील मालती नेमावरकर आणि रेखा रामदास या ज्येष्ठ महिलांनी सांगितले.