जिल्ह्यातील बहुतांश भागात सध्या अखंड वीज पुरवठा करण्याचा महावितरणचा प्रयत्न असला तरी थकबाकी वसुली आणि वीजगळती या निकषात अडकलेल्या जिल्ह्यातील ४९ वाहिन्यांवर प्रकाशाचा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपोत्सवात अंधाराचे संकट कायम राहण्याची शक्यता आहे. मागणी व पुरवठा यात तफावत निर्माण झाल्यास उपरोक्त वाहिन्यांवर भारनियमनाशिवाय गत्यंतर नाही.
वीज भारनियमन करताना महावितरणने एक सूत्र निश्चित केले आहे. ज्या वाहिनीवर (फिडर) वसुली कमी व गळती जास्त आहे, अशा वाहिन्यांवर भारनियमन केले जाते. ग्राहकांनी नियमितपणे वीज देयके भरावीत ही शिस्त लावण्यासाठी कंपनीने हा मार्ग अनुसरला आहे. या निकषानुसार प्रत्येक वाहिनीचे ए, बी, सी, डी तसेच ई, एफ व जी असे गट पाडण्यात आले आहेत. त्यात ए, बी, सी, डी गटातील वाहिन्या या भारनियमन मुक्त असून ई, एफ व जी या गटातील वाहिन्यांवर किमान पावणे सहा तास ते कमाल सात तास भारनियमन केले जाते. नाशिक शहरातील १२२ वाहिन्या असून त्या सर्व भारनियमनमुक्त गटातील आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये एकूण १२५ वाहिन्या असून त्यातील ७६ भारनियमनमुक्त तर ४९ वाहिन्या भारनियमन होणाऱ्या गटात आहेत. यामुळे मालेगाव शहर, मनमाड तसेच जिल्ह्यातील इतर काही भागात भारनियमन होत आहे. मागील काही दिवसांपासून उपरोक्त ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत करण्याचा महावितरण प्रयत्न करत असल्याचे जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले. तथापि, राज्यात विजेची मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाल्यास उपरोक्त वाहिन्यांना भारनियमनाचा सामना करावा लागतो. मालेगाव व मनमाड शहरात शहरात वीज देयकांची थकबाकी असल्याने नागरिकांना दररोज दोन ते चार तास भारनियमनाचा सामना करावा लागतो. ग्रामीण भागात शेतीसाठी दररोज केवळ आठ तास वीज उपलब्ध असते. रात्री सिंगल फेजिंगमार्फत वीज दिली जाते. भारनियमन बंद करावे म्हणून मनमाड व मालेगाव येथे सातत्याने आंदोलन सुरू असते. कार्यालयातील अधिकाऱ्यांना घेराव घालणे, अधिकाऱ्यांशी असभ्य भाषेत बोलणे असे प्रकार घडत असून कर्मचाऱ्यांना काम करणे अवघड झाले आहे. वेळेवर देयके भरून व वीज चोरीला आळा घालून भारनियमन कमी करणे शक्य आहे. ग्राहकांनी वेळेवर विजेची देयके भरून सहकार्य करणे आवश्यक असल्याची वीज कंपनीची भूमिका आहे.
ई, एफ, जी गटात समाविष्ट असणाऱ्या वाहिन्यांवर भारनियमन होऊ नये म्हणून प्रयत्न केले जात असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. तथापि, उपरोक्त वाहिन्यांवर दररोज भारनियमन होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. मालेगाव शहरात वेगवेगळ्या भागात दोन ते चार भारनियमन केले जाते. दीपोत्सवात मालेगाव व मनमाड शहरासह जिल्ह्यातील ४९ वाहिन्यांवरील परिसरात भारनियमनाची टांगती तलवार कायम राहणार आहे. काही ग्राहकांच्या कार्यशैलीचा फटका नियमितपणे देयके भरणाऱ्या नागरिकांना विनाकारण सहन करावा लागत आहे. ज्या फिडरवर वसुली कमी होते, त्या ठिकाणी भारनियमन केले जाते. परंतु, त्या फिडरच्या जोडणीवरही नियमितपणे वीज देयक भरणारे काही ग्राहक असतात. ऐन दीपावलीत त्यांची भारनियमनातून सुटका होणार नाही. थकीत वीज देयके जोपर्यंत भरली जात नाही, तोपर्यंत हा बडगा सहन करावा लागणार आहे. भारनियमन बंद करावे म्हणून मोर्चे काढणाऱ्या संघटनांनीदेखील ग्राहकांनी वीज देयके थकीत होऊ देऊ नये म्हणून लक्ष देणे तितकेच गरजेचे असल्याचे वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची भावना आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा