पनवेल तालुक्यातील जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. मोठय़ा प्रमाणात टोलेजंग इमारती या ठिकाणी उभ्या राहत असून लोकसंख्येतदेखील भर पडली आहे. वेगाने विकास होत असलेल्या पनवेलकरांना दोन वेळेला पाणी पुरवठा होत असताना पनवेलपासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर असलेली गावे मात्र तहानलेली आहेत. गुळसुंदे, आक्कुळवाडी आणि लाडिवली या गावांतील ग्रामस्थांची पाण्यासाठीची करुण कहाणी आहे. या गावातील ग्रामस्थ महिला पहाटे, रात्री चातकासारखी पाण्याच्या प्रतीक्षेत असतात. मात्र आठवडय़ातून एकदाच दीड तासांसाठी त्यांच्या येथील नळाला पाणी येते. हे पाणी कधी येणार याची वेळ, काळ, वार निश्चित नाही. तशी सोय करावी असेही महाराष्ट्र प्राधिकरणाला कधी वाटले नाही.
या गावातील ग्रामस्थ सुर्वणमहोत्सवी वर्षांत पाण्याच्या टंचाईने होरपळत आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत गावातील काही महिलांनी मतदान न करता सरकारप्रती आपला रोष दर्शविला होता. सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून या गावांना पाणी पुरवठा होतो. पाच दिवसांनी मिळणारे पाणी अचानक कधीही येते. त्यानंतर पाणी साठवण्यासाठी गावातील प्रत्येकाची रस्सीखेच सुरू होते. गावात अनेकांनी विजेवर चालणाऱ्या मोटार पंपाच्या साह्य़ाने पाणी साठवण्यासाठी घरात प्लॅस्टिक लहानमोठय़ा ड्रमांचा खच जमा केला आहे. पाच दिवसांनी मिळणारे पाणी हे दूषित असल्याने गावात काविळीची साथ बारमाही असते.
पाण्याच्या या रोजच्या लढाईमुळे या गावात चांगला वर असला तरी पंचक्रोशीतील गावकरी या गावांमध्ये आपली वधू देताना जरा विचार करतात. दहा वर्षांपूर्वी या गावात सरकारने जलकुंभ आणि जलवाहिनीसाठी ४५ लाख रुपये खर्च केला आहे. मात्र जल नसेल तर वाहिनीत पाणी कोठून येणार असा प्रश्न येथील ग्रामपंचायतीला पडला आहे. गावासाठी असणारे १० दशलक्ष लिटरचे जलकुंभ डोंगरावरती बांधण्यात आले आहे. जलकुंभ आणि गाव या दरम्यान कोकण रेल्वेचे दोन रूळ आहेत. जलशुद्धीकरणासाठी क्लोरीनचे सिलेंडर जलकुंभापर्यंत नेण्यासाठी कोकण रेल्वेचे रूळ ओलांडण्यासाठी दोन वर्षांपूर्वी कोकण रेल्वे प्रशासनाने मज्जाव केल्याने हे ग्रामस्थ विनाशुद्धीकरणाचे पाणी पितात. दूषित पाणी वेळेवर मिळावे, अशी येथील महिलांची अपेक्षा आहे. पाण्याविना घर चालत नाही, मात्र घरगुती सगळी कामे सोडून पाणी नळाला येण्याची चातकासारखी वाट पाहवी लागते, अशी व्यथा प्रगती प्रकाश पाटील या महिलेने व्यक्त केली आहे. गुळसुंदे गाव हे पनवेल तालुक्याच्या परिसरात आहे. गुळसुंदे ग्रामपंचायत उरण विधानसभा मतदारसंघात मोडते. येथे सुमारे २५०० मतदार आहेत. याव्यतिरिक्त तुराडे, कष्टकरीनगर, वावेघर (झोपडपट्टी), दापिवली असा परिसरही या ग्रामपंचायतीमध्ये येतो. ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाची सत्ता आहे.
याबाबत गुळसुंदे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक रवींद्र म्हात्रे आणि ग्रामपंचायतीचे उपसरपंच आर. डी. पाटील यांनी गावची पाणी टंचाई दूर करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. गुळसुंदे ग्रामपंचायतीने यासाठी गुळसुंदे गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या उसरण धरणातून पाणी घेण्याचा विचार असल्याचे सांगितले. त्यासाठी देवळोली, पोसरी आणि सावळा या गावांचे ना हरकत मिळाली आहे. यासाठी दीड कोटी रुपये खर्च आहे. उसरण धरणातून जलवाहिनी आणि जलशुद्धीकरण, पंपिंग स्टेशन अशासाठी दीड कोटी रुपये खर्च होणार आहे. लवकरच या प्रस्तावाची फाइल रायगड जिल्हा परिषद अलिबाग, त्यानंतर ठाणे यांच्या मंजुरीनंतर ही फाइल सचिवालयात अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. मंजुरीनंतर या कामाला सुरुवात होईल. या अमंलबजावणीनंतर गुळसुंदे गावाला हक्काचे पाणी मिळेल अशी माहिती ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा