सोने व चांदीच्या दराचा आलेख चढता असल्याचे दिसत असले तरी जागतिक पातळीवरील मंदीचा फटका सराफा व्यवसायाला बसला आहे. दिवाळी दोन दिवसांवर आलेली असतानाही ग्राहकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाही. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावरच सोने व चांदी खरेदीकडे ग्राहकांचा कल असल्याचे दिसून आले.
गेल्या जून व जुलैमध्ये २६ हजार तोळ्यापर्यंत खाली आलेले सोन्याचे दर आता ३२ हजार रुपये तोळ्यापर्यंत पोहोचले आहेत. त्या तुलनेत चांदीच्या दरात मात्र फारशी वाढ झालेली नाही. या दोन दिवसात मात्र चांदीचे दर वाढत असून ५३ हजार रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. दिवाळीत चांदीपेक्षा सोने खरेदीकडेच ग्राहकांचा कल अधिक आहे.
दिवाळीत ग्राहकांकडून खरेदीला चांगला प्रतिसाद मिळेल, असा आशावाद सराफा व्यावयायिकांनी व्यक्त केला. सोने, चांदी व हिऱ्याच्या दागिन्यांमध्ये नवीन रचना आणि सोन्याच्या हलक्या वजनाच्या दागिन्यांना ग्राहकांकडून मागणी होत आहे. दिवाळीच्या निमित्ताने सराफा व्यावयायिकांनी नवीन रचना सादर केल्या आहेत. टेम्पल ज्वेलरी, निजाम ज्वेलरी, पेशवाई दागिन्यांना ग्राहकांची पसंती असल्याचे बटुकभाई ज्वेलर्सचे भागीदार भरत सेठ यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
या वर्षी नागपुरात प्रथमच हिऱ्यामध्ये खास ‘कलर डायमंड’ सादर करण्यात आले आहे. चांदी बाली हेसुद्धा यावर्षीचे नवे आकर्षण आहे. कार्पोरेट गिफ्ट, सिल्व्हर आर्टिफॅक्सचीही मागणी होत आहे. कार्पोरेट गिफ्ट ५०० रुपयांपासून दोन लाख रुपयांपर्यंतच्या किमतीत उपलब्ध आहे. पुढील दोन दिवसात दिवाळीच्या शुभपर्वावर ग्राहकांकडून सोने-चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली जाईल. धनोत्रयोदशीचा मुहूर्तावर मोठी उलाढाल उपेक्षित आहे, असे सेठ म्हणाले.
मध्यमवर्गीय महिलांना कमी किमतीत अधिक आकर्षक दागिने खरेदी करणे आवडते. सामान्यांना सोने खरेदी करता यावे म्हणून सराफा व्यावयायिकांनी गुंतवणुकीच्या योजनाही सुरू केल्या आहेत. यातून दर महिन्याला विशिष्ट रक्कम भरून दिवाळीला ग्राहक सोने व चांदी खरेदी करतात, या योजनांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. सराफा व्यवसायाच्यादृष्टीने सध्याचा काळ मंदीचा आहे. या आठवडय़ात खरेदीला ग्राहकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही, पण आता काही कर्मचाऱ्यांचे पगार झालेले असल्याने ते खरेदीसाठी बाहेर पडू लागले आहेत. अलीकडच्या काळात सोन्याचे दागिने ‘बीएसआय’ मार्किंग असल्याने त्याची पुनर्विक्री करताना घट होत नाही. त्यामुळे ‘होलमार्क’च्या दागिन्यांना चांगली मागणी आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावरच ग्राहकांकडून मोठय़ा प्रमाणात सोने खरेदी होईल, असे वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या शाखा व्यवस्थापक स्नेहल तुपे यांनी सांगितले. सामान्य ग्राहकांनाही दिवाळीत सोने खरेदी करता यावे म्हणून व्यावसायिकांनी २५० मिलीग्रॅम वजनाचे नाणेही विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे. सोने खरेदीसाठी बँकांनीही ग्राहकांना आर्थिक साह्य़ उपलब्ध करून दिले आहे.

Story img Loader