* चिखलोली आणि भोज धरणातील गाळ काढणार
* भोज धरण बदलापूर पालिकेला देण्यास मान्यता
अंबरनाथ पालिकेच्या ताब्यात असलेल्या चिखलोली तसेच नुकतेच पाटबंधारे खात्याकडून बदलापूर पालिकेकडे हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आलेल्या भोज धरणातील गाळ काढण्यास शासनाने मान्यता दिल्याने या दोन्ही शहरांना पुढील वर्षांपासून अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे.
सध्या मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने प्रस्तावित असलेले सर्व प्रकल्प कागदावर असल्याने अतिरिक्त पाणी पुरवठय़ासाठी अन्य पर्यायांचा अवलंब केला जात आहे. एकीकडे नवे धरण प्रकल्प मार्गी लागत नाहीत, तर दुसरीकडे गाळ साठत असल्याने अस्तित्वात असलेल्या धरणांमधील जलसाठय़ांमध्ये घट होत आहे. धरणातील गाळ उपसला तर जलसाठय़ांमध्ये २० टक्के होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. अंबरनाथ तालुक्यातील चिखलोली तसेच भोज ही दोन्ही धरणे कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या अखत्यारीत होती. काही वर्षांपूर्वी चिखलोली धरण अंबरनाथ पालिकेने विकत घेऊन तिथे पाणी योजना राबवली. सध्या या धरणातून शहराच्या पूर्व विभागास प्रतिदिन सहा दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा होतो. आता भोज धरण बदलापूर पालिकेला मिळणार असल्याने बदलापूरकरांना येथून अतिरिक्त पाणी मिळू शकणार आहे. या धरणातून शहरास प्रतिदिन सहा दशलक्ष लिटर्स पाणी मिळू शकते. त्यामुळे येथून तब्बल ४० हजार बदलापूरकरांना पाणी मिळू शकेल.
या दोन्ही धरणांची उंची वाढविण्याची योजनाही विचाराधीन आहे. मात्र त्यासाठी वन तसेच पर्यावरण खात्याच्या परवानग्या मिळवाव्या लागणार आहेत. अर्थातच त्यास बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. मात्र आता गाळ काढण्यास मान्यता दिल्याने एक वर्षांच्या आत या दोन्ही धरणांमधून अतिरिक्त पाणी मिळू शकणार आहे. या कामासाठी लागणारी सर्व यंत्रणा कोकण पाटबंधारे विकास महामंडळ उपलब्ध करून देईल तर डीझेलचा खर्च दोन्ही पालिका प्रशासनांना करावा लागेल, अशी माहिती उपाध्यक्ष आणि आमदार किसन कथोरे यांनी वृत्तान्तशी बोलताना दिली.
बदलापूरसाठी तीन दशकांचे जलनियोजन
वितरण व्यवस्थेतील दोषांमुळे बदलापूर पूर्व विभागातील अनेक वसाहतींना गेली काही वर्षे अपुरा पाणी पुरवठा होत होता. आता म्हाडा वसाहतीतील २० लाख लिटर्स क्षमतेचा जलकुंभ कार्यान्वित झाल्याने कात्रप, शिरगांव परिसरातील पाणी टंचाई दूर झाली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत शहरातील जल वितरण व्यवस्थेसाठी ८१ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून शुद्धीकरण प्रकल्प, उंच जलकुंभ आणि नव्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. सध्या बदलापूर शहरासाठी उल्हास नदीत ९० दशलक्ष लिटर्स प्रतिदिन पाणी आरक्षित आहे. मात्र गळतीमुळे प्रत्यक्षात निम्मेच पाणी शहरवासीयांना मिळते. नव्या वितरण व्यवस्थेमुळे गळतीच्या प्रमाणात लक्षणीय घट होईल. सध्याचे पाणी आरक्षण २०१६ च्या लोकसंख्येसाठी पुरेसे आहे. शिवाय भोज, इंदगाव आणि चिंचवली या छोटय़ा प्रकल्पांमधून बदलापूरला आणखी पाणी मिळू शकणार आहे. थोडक्यात पुढील ३० वर्षे बदलापूरकरांना पाण्याची चिंता भेडसाविणार नाही, असा दावा संबंधित अधिकाऱ्यांनी केला आहे.
अंबरनाथ-बदलापूरकरांना मिळणार अतिरिक्त पाणी..!
* चिखलोली आणि भोज धरणातील गाळ काढणार * भोज धरण बदलापूर पालिकेला देण्यास मान्यता अंबरनाथ पालिकेच्या ताब्यात असलेल्या चिखलोली तसेच नुकतेच पाटबंधारे खात्याकडून बदलापूर पालिकेकडे हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आलेल्या भोज धरणातील गाळ काढण्यास शासनाने मान्यता दिल्याने या दोन्ही शहरांना पुढील वर्षांपासून अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-04-2013 at 01:43 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People of ambernath badlapur will get more water