निवडणुकीत निवडून आल्यानंतर पुढची पाच वर्षे लोकप्रतिनिधी आणि मतदार यांच्यात कोणताही संवाद असत नाही. गोरेगावमधील नागरिकांनी या प्रथेला छेद देण्याचे ठरविले आहे. महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांच्या कामांचा आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा आढावा दरवर्षी जाहीरपणे घेण्याची नवीन प्रथा गोरेगावात सुरू होत आहे. येत्या रविवारी, २४ मार्च रोजी वॉर्ड क्र. ४६ व ४८ मधील उमेदवारांची एकप्रकारे परीक्षा ‘गोरेगावकर नागरिक’ घेणार आहेत. दस्तुरखुद्द महापौर सुनील प्रभू हेच या परीक्षेला बसणार असून परीक्षक म्हणून सामाजिक कार्यकर्ते व माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी उपस्थित राहणार आहेत.
‘गोरेगावकर नागरिक’ या संघटनेने मागील वर्षी महापालिका निवडणुकांआधी या दोन्ही वॉर्डमधील प्रमुख उमेदवारांना एका व्यासपीठावर आणले होते. त्याच वेळी दरवर्षी या सगळ्यांना एका व्यासपीठावर आणून जनतेला त्यांना प्रश्न विचारण्याची आणि या उमेदवारांनाही आपले म्हणणे मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार हा पहिला कार्यक्रम होणार आहे. वॉर्ड ४८ चे सुनील प्रभू आणि वॉर्ड ४६ च्या वर्षां टेंबवलकर या विजयी उमेदवारांसह सुनीता चुरी आणि रेखा सिंग तसेच सुनील बारी आणि संतोष घोगले हे पराभूत उमेदवारही गेल्या वर्षभरातील आपल्या कामगिरीचा लेखाजोखा जनतेपुढे मांडणार आहेत. तसेच त्यानंतर सर्व उमेदवारांना जनतेकडून प्रश्नही विचारले जाणार आहेत. गोरेगाव (पूर्व) येथील गोरेगाव जिमखाना येथे सायंकाळी ६.०० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान
सध्याचे तरुण इंटरनेटवर फेसबुक, ट्वीटर, इ-मेल तसेच व्हॉट्स अप आदींच्या माध्यमातून खूप सक्रिय असतात. परंतु प्रत्यक्षात अनेक सामाजिक चळवळींमध्ये त्या प्रमाणात त्यांचा सहभाग दिसत नाही. या पाश्र्वभूमीवर ‘आजचा तरुण ‘व्हच्र्युअल वर्ल्ड’मध्ये वावरतो आहे की ‘रिअल वर्ल्ड’मध्ये?’ या विषयावर अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. दुपारी ४.०० वाजता गोरेगाव जिमखान्यालगतच्या मातृमंदिर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.