पावसाच्या कमी प्रमाणामुळे निर्माण होणाऱ्या दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी पाणलोट विकासासारख्या क्षेत्रात लोकसहभाग व राजकीय इच्छाशक्ती आवश्यक आहे, असे मत जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी व्यक्त केले.
‘सिटू’ च्या जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पुरंदरे यांचे ‘पाणी व्यवस्थापन व जलसाक्षरता’ विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी प्रा. बी. वाय. कुलकर्णी होते. ‘सिटू’ चे महाराष्ट्र सचिव अण्णा सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. पुरंदरे म्हणाले की, कमी पाऊस झाला तरी त्याचे योग्य नियोजन करावयास हवे. जालना शहराजवळील कडवंची गावाने पडणाऱ्या पावसाचा उपयोग करून पाणलोट क्षेत्राचा कसा विकास केला हे आपण पाहिले पाहिजे. त्यासाठी लोकसहभाग कसा वाढविता येईल, याचे प्रयत्न झाले पाहिजेत.
जायकवाडी जलाशयात येणारे पाणी वरच्या भागात अडविले जाते, असे सांगून ते म्हणाले की, २००५ मध्ये जलसंपत्ती नियमन कायदा झाला असला, तरी मागील ७-८ वर्षांत या संदर्भात नियम व एकत्रित आराखडा तयार झाला नाही. पिण्यासाठी, शेतीसाठी व उद्योगासाठी असा पाणी देण्याचा क्रम असला तरी तो पाळण्यात येत नाही. त्यामुळे शेती उत्पादनावर परिणाम होतो. पाण्याची चोरी व गळतीचे प्रमाणही मोठे असते. केवळ योजना करून चालत नाही, तर त्या योजनांची देखभालही महत्त्वाची असते. उस्मानाबाद जिल्ह्य़ाकडे पाटबंधारे खाते असताना तेथे ९४० कोल्हापूर पद्धतीचे बंधारे झाले; पण त्यापैकी अनेकांचे दरवाजे चोरीस गेल्यामुळे त्यांचा उपयोग झाला नाही. जालना शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती कमी पडत असल्याचा आरोपही पुरंदरे यांनी केला. जालना शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आंदोलनात्मक मार्गाची आवश्यकता प्रा. बी. वाय. कुलकर्णी यांनी व्यक्त  केली. उद्योजक सुनील रायठठ्ठा, कृषी विज्ञान केंद्राचे पंडित वासरे आदींची उपस्थिती होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा