संदेशनगर झोपडपट्टीतील तब्बल १२० कुटुंबांचे पुनर्वसन करणे हे खरोखरच आव्हान होते. प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतरही अनेक अडचणी उभ्या राहिल्या. लोक विचारत होते, काय आता बांधकामाला चार-पाच का आणखी वर्षे लागणार; पण सतरा महिन्यात ही योजना आम्ही पूर्ण केली. त्यामुळे कर्तव्यपूर्तीचे समाधान वाटत आहे, असे मनोगत नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी गुरुवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.
पुणे शहरात एसआरए योजनेत अवघे चार-पाच प्रकल्प साकारलेले असताना संदेशनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या १२० कुटुंबांना सदनिकांचा ताबा देण्याचा समारंभ रविवारी होत आहे. त्या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी हा प्रकल्प पत्रकारांना दाखवण्यात आला. जागेवर उभी राहिलेली दहा मजली इमारत आणि सदनिकांचे अतिशय दर्जेदार बांधकाम यामुळे हा प्रकल्प पाहणारा प्रत्येकजण कामाची वाखाणणी करत असल्याचे भिमाले यांनी सांगितले. आयुक्त महेश पाठक यांनीही गेल्या आठवडय़ात या प्रकल्पाला भेट देऊन या प्रकल्पाचे कौतुक केले आणि अशाच प्रकारच्या योजना साकारल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.
येथे राहायला येणाऱ्यांना सर्व त्या सुख-सुविधा दिलेल्या आहेत. एकही गोष्ट देण्याची बाकी नाही. त्यामुळे या पुनर्वसनात कोणताही वाद झाला नाही तसेच कोणीही जादा घरांची मागणी केली नाही. हे सर्व विश्वासामुळेच शक्य झाले, असेही भिमाले म्हणाले. सुरुवातीला तात्पुरत्या निवाऱ्यासाठी लोकांची लांब जाण्याची तयारी नव्हती. त्यासाठी अतिशय जवळच त्यांना निवारे बांधून दिले. त्यामुळे एकाच दिवसात जुनी झोपडपट्टी पाडता आली. नंतर लोक विचारत होते, दोन-चार, पाच किती वर्षे लागणार; पण ताब्याचा जो दिनांक ठरला होता, त्याच्या पाच महिने अगोदरच आम्ही ताबा देत आहोत, अशीही माहिती त्यांनी दिली.
 काम सुरू असताना सर्व नागरिक ते काम जवळून पाहात होते. त्यावेळी ही इमारत त्यांच्यासाठी तयार होत आहे यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. आता त्यांचे नातेवाईकही ही घरे पाहायला येत आहेत आणि मनापासून आनंद व्यक्त करत आहेत. अशाच पद्धतीचे दर्जेदार काम झाले, तर एसआरए योजनेकडे चांगल्या नजरेने पाहिले जाईल, असाही विश्वास भिमाले यांनी व्यक्त केला.

Story img Loader