भारतीय लोकशाही ठणठणीत वाटत असली तरी त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात सुशासनाचा अभाव आहे. सुशासनाची लोकप्रतिनिधी, नोकरशहांकडून कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने अण्णा हजारे यांचे आंदोलन, नवी दिल्लीतील पीडित मुलीचे प्रकरण या माध्यमातून नागरिक आपल्या भावनांचा उद्रेक दर्शवत आहेत, असे प्रतिपादन रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी रविवारी येथे केले.
दिवंगत आनंद दिघे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शहरप्रमुख सदानंद थरवळ, मिलिंद दुदवडकर, अविनाश हजारे, नितीन मटंगे गेले अनेक वर्षांपासून आनंद व्याख्यानमाला भागशाळा मैदानात आयोजित करीत आहेत. या मालिकेतील तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते.
महासत्तेच्या दिशेने प्रवास करणाऱ्या भारतात गेल्या साठ वर्षांत तेच नागरी समस्यांचे प्रश्न, राजकीय पक्षांचे तेच-तेच जाहीरनामे असे चित्र दिसत आहे. कोणत्याही समस्येचे निराकरण सहज होत नसल्याने नागरिकांमध्ये शासन, राजकीय व्यवस्थेविषयी तीव्र नाराजी आहे. जगातील अन्य देश लोकशाही स्वीकारण्यासाठी धडपडत आहेत. काही देश लोकशाहीची प्रभावीपणे अंमलबजावणी करीत आहेत. मग, भारतातच लोकशाही पोखरून तिचा सांगडा का तयार होत आहे याचा विचार करण्याची वेळ येथील लोकप्रतिनिधी, शासन, जनता, संस्था या व्यवस्थांवर आली आहे, असे डॉ. सहस्रबुद्धे  म्हणाले.