दीपावलीच्या सुट्टय़ांमुळे शिर्डीत साईदर्शनासाठी गर्दीचा महापूर लोटला असून गर्दीचे नियोजन करण्यात संस्थानच्या प्रशासनाला अपयश आले, तर वाहतुकीचेही नियोजन कोलमडल्याने वारंवार वाहतूक ठप्प होऊन भाविकांचे हाल झाले.
संस्थान प्रशासनाला वाढत्या गर्दीचा अंदाज न आल्याने दर्शनरांगेची व्यवस्था कोलमडल्याने अनेकांना उन्हात उभे राहावे लागले. रांगेत भक्तांना पिण्याचे पाणी न मिळाल्याने अनेकजण चक्कर येऊन पडले. दर्शनरांग लक्ष्मीनगरपर्यंत गेली होती. गर्दीच्या काळात प्रशासनाचे नियोजनाकडे दुर्लक्ष होते हे यावरून स्पष्ट झाले. दर्शनरांगा उघडय़ावर गेल्या होत्या. परंतु नवीन व्यापारी संकुलासमोरील मारूती मंदिराशेजारी मोकळी जागा असतानाही या जागेवर संस्थानने बॅरिकेटस् लावल्याने भक्तांची गैरसोय झाली. संस्थानच्या या आडमुठय़ा धोरणाबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली. संस्थानचे भक्तनिवास खचाखच भरल्याने तात्पुरती निवास व्यवस्था करण्यात आली, परंतु शामियानाऐवजी आडोशाला पडदे लावल्याने भक्तांना रात्रभर थंडीत कुडकुडावे लागले. संस्थान अधिकाऱ्यांच्या मनमानीचा फडकाही भक्तांना बसत आहे.
सुट्टय़ांच्या काळात वाढणारी गर्दी लक्षात घेता नगर-मनमाड रस्त्यावरची वाहतूक इतर मार्गे वळविण्यात येते, मात्र याचा विसर पोलीस व जिल्हा प्रशासनाला पडल्याने वाहतुकीची कोंडी झाली. अवैध प्रवासी वाहतूकही बोकाळली आहे. गर्दीच्या काळात कोणीही मोठय़ा अधिकाऱ्याने शिर्डीत भेट देऊन पाहणी केली नाही. त्यामुळे शिर्डीत सध्या सर्वकाही साईभरोसेच
आहे.      

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Peoples are facing problemms in shirdi because of poor management