शुक्रवारी स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीपासून सोमवारी दहीहंडीपर्यंतच्या चार दिवसांच्या सुट्टीच्या हंगामाचा आनंद लुटण्यासाठी मुंबई, पुण्यापासून जवळचे पर्यटन स्थळ असणाऱ्या लोणावळा, खंडाळ्यात अभूतपूर्व गर्दी उसळल्याचे दिसून आले. लोणावळा रेल्वे स्थानकापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पर्यटकांच्या आवडत्या भुशी डॅम व टायगर हिल पर्यटन स्थळावर या चार दिवसांत चार लाख पर्यटकांनी हजेरी लावल्याची नोंद झाली आहे. मोठय़ा प्रमाणात आलेल्या पर्यटकांमुळे या मार्गावर पाच ते सहा तासांची वाहतूक कोंडी सहन करावी लागली, तर स्थानिक विक्रेत्यांनी या संधीचे सोने करताना खाद्यपदार्थाच्या किमती ५० टक्क्यांनी, तर हॉटेल्सचालकांनी रूम्सच्या किमती वाढवल्या होत्या. पावसाळ्यात हवीहवीशी वाटणारी मक्याची कणसे चक्क ५० ते १०० रुपयांनी विकली गेली.
या वर्षी जूनमध्ये पावसाने दडी मारली होती. त्यामुळे भुशी डॅम भरून वाहिला नाही. त्यामुळे डॅमच्या पायऱ्यावर बसून भिडण्याचा आनंद लुटता आला नाही. सर्वसाधारणपणे श्रावण महिन्यापर्यंत या डॅमवर येणाऱ्यांची संख्या कमी होत असल्याचा अनुभव आहे, पण जुलैपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्याने भुशी डॅमवर जाणाऱ्या पर्यटकांनी आपले बेत ऑगस्टमध्ये येणाऱ्या शुक्रवार ते सोमवार या चार दिवसांसाठी राखून ठेवले होते. त्यामुळे शुक्रवारी लोणावळ्यात मुंबई-पुण्याहून जाणाऱ्या लोकल रेल्वे पर्यटकांनी भरून जात होत्या.
सर्वसामान्य पर्यटकांच्या सार्वजनिक वाहतुकीच्या या वापराबरोबरच स्वत:ची वाहने घेऊन जाणाऱ्यांची संख्या या चार दिवसांत अभूतपूर्व होती. मागील चार दिवसांत या पर्यटन स्थळांवर दीड लाख वाहने आणि चार लाख पर्यटकांनी हजेरी लावल्याचे लोणावळा पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी सांगितले.
एका रांगेत शिस्तीने गाडय़ा चालविल्या जात नसल्याने लोणावला डॅमनंतर या मार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत होते. त्यामुळे पोलिसांनी येणाऱ्या वाहनांना काही काळ बंदी घातली. त्यामुळे चार-पाच तासांच्या प्रवासाने भुशी डॅमवर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी बसायलादेखील जागा मिळत नसल्याचे कृष्णा दत्त या पर्यटकाने सांगितले. या डॅमच्या आजूबाजूला असणाऱ्या हिरव्यागार डोंगराच्या कुशीतून निघणाऱ्या धबधब्यावर तेवढीच गर्दी केली गेल्याचे दिसून येत होते. भुशी डॅमनंतर अॅम्बी व्हॅली मार्गावर येणाऱ्या टायगर हिल पठारावरदेखील पर्यटकांनी खूप मोठय़ा प्रमाणात हजेरी लावली होती. तेथील मक्याची भजी आणि चहा यांच्यावर ताव मारला जात होता.
चारही बाजूंनी पसरलेले धुके आणि थंडगार वारा अंगावर घेणाऱ्या पर्यटकांनी अलीकडे या पर्यटन स्थळाला खूप मोठी पसंती दिली आहे. तळीरामांवर पोलिसांनी अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही कोल्ड ड्रिंक्समधून त्याची मजा घेतली जात होती.
या मार्गावर बसणारे चहा, कणसे, भजी, मॅगी विक्रेत्यांनी या अभूतपूर्व गर्दीची संधी उचलताना अनेक खाद्यपदार्थामध्ये ४० ते ५० टक्क्यांनी वाढ केल्याचे दिसून येत होते. भुशी डॅमने या चार दिवसांत मागील अनेक वर्षांतील गर्दीचे रेकॉर्ड तोडल्याचे दिसून येत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा