तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांचे रडवेले, त्रासिक चेहरे असे वातावरण एरवी अनुभवत असलेल्या पोलीस आयुक्त कार्यालयातील हिरवळीने मंगळवारी वेगळाच अनुभव घेतला. चोरीस गेलेला वा हरवलेला मुद्देमाल पोलिसांकडून सन्मानपूर्वक मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
विविध गुन्ह्य़ात जप्त मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रियेनंतर फिर्यादींना परत देण्याची मोहीम घेण्याचे आदेश स्थापना दिनानिमित्ताने पोलीस महासंचालकांनी दिला. त्यानुसार नागपुरातील ८६ फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल सन्मानपूर्वक मंगळवारी पोलीस आयुक्त कौशल पाठक, सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अंबाझरी, सीताबर्डी, सोनेगाव, सदर, गिट्टीखदान, जरीपटका, पाचपावली, लकडगंज, यशोधरानगर, गणेशपेठ, तहसील, अजनी आणि वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४६ अशा एकूण ८६ फिर्यादींना मंगळवारी या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते.  आयुक्तालयाच्या हिरवळीवर पोलीस आयुक्त कौशल पाठक, सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे व अनंत शिंदे, उपायुक्त सुनील कोल्हे, कैलास कणसे, मंगलजित सिरम, संजय दराडे, चंद्रकिशोर मीणा, श्रीप्रकाश वाघमारे, राजेश जाधव व जीवराज दाभाडे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. पोलीस आयुक्तांच्या हस्ते फिर्यादींना गुलाब पुष्प तसेच मुद्देमाल प्रदान करण्यात आला. मुद्देमाल परत मिळाल्याने तरुण, वृद्ध फिर्यादींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात होता. कुणाला वाहन, कुणाला सिलेंडर, कुणाला टीव्ही, कुणाला मंगळसूत्र, कुणाचे दागिने, कुणाचा कॅमेरा तर कुणाची रोख रक्कम परत मिळाली.