ठाणे-डोंबिवलीनंतरचे सांस्कृतिक शहर म्हणून बिरुदावली मिरविणाऱ्या बदलापूर शहरामध्ये मनोरंजनासाठी एकही हक्काचे असे ठिकाण नाही. शहरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात, पण ते एखाद्या शाळेच्या पटांगणांवर नाही तर मंगल कार्यालयात. त्यामुळे आवड असूनही अनेक रसिक मंडळी त्याकडे पाठ फिरवतात. गेल्या अनेक वर्षांपासून येथील रसिकांची नाटय़गृहाची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यांची ही साधी मागणी पूर्ण करण्याची इच्छाशक्तीच येथील तथाकथित कार्यसम्राट लोकप्रतिनिधींकडे नाही हेच या दिरंगाईमुळे स्पष्ट होते.
गेल्या काही वर्षांत बदलापूर शहराची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. बैठी घरे, चाळींच्या ठिकाणी आज मोठ-मोठय़ा इमारती उभ्या राहिल्या आहेत. जुलै २००५ नंतरच्या प्रलयंकारी महापुरानंतर बदलापूरचा विकास कुठेतरी खुंटेल, असे वाटले होते. परंतु पूर्वीपेक्षा जास्त जोमाने येथे बांधकामे सुरू आहेत. शहराचा पूर्व भाग तर इमारतींनी व्यापून टाकला आहे. या ठिकाणी राहण्यासाठी आलेल्या नागरिकांना सोयी-सुविधा पुरविण्यात स्थानिक नगरपालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. लोकसभा, विधानसभा निवडणूक असो की नगरपालिका निवडणूक, र्सवच राजकीय पक्षांकडून शहरातील सांस्कृतिक वातावरणाचे गोडवे गायले जातात. तसेच पक्षांच्या जाहीरनाम्यातही नाटय़गृहाचे आश्वासन दिले जाते. परंतु नाटय़गृहासाठी एखादी जागाही अद्याप निश्चित झालेली नाही. बदलापुरातील नाटय़रसिकांना आपली हौस भागविण्यासाठी कल्याण, डोंबिवली, ठाणे तसेच थेट दादर गाठावे लागते. हा द्राविडीप्राणायाम करताना रसिकांची चांगलीच दमछाक होते. त्यात रविवार हा रेल्वेचा मेगाब्लॉकचा दिवस असतो. त्यामुळे रविवारी एखादे नाटक बघावयास बाहेर पडावे तर आणखी हाल, अशी एकंदर परिस्थिती आहे. आजघडीला शहरात एक चित्रपटगृह सोडले तर मनोरंजनासाठी कोणतेही साधन नाही. उपलब्ध आहे ते चित्रपटगृहही ‘मल्टिफ्लेक्स’च्या स्पर्धेत मागे पडले आहे. शहरात नाटय़गृह झाले, तर अंबरनाथ, वांगणी, नेरळ आदी ठिकाणच्या नाटय़रसिकांची चांगली सोय होईल, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा