रस्त्यात एखाद्यावर वाईट प्रसंग आला, अपघात झाला तर तिथे उपस्थित असलेल्या लोकांचे प्रसंगावधान संबंधित व्यक्तीला वाचवू शकते. मुंबईत गेल्या दोन महिन्यांत काही घटना घडल्या. त्यावेळी अनेकजण त्या घटनांचे साक्षीदार होते. पण मदतीला कुणी पुढे आले नाही. एशियाडमध्ये प्रवासी असताना बसचालकाचे अपहरण झाले, मित्रांसमोर हत्या झाली किंवा अपघातात जखमी झाल्यावरही तरुणीला मदत मिळाली नाही. या काही घटना. या सर्व प्रसंगात एकानेही मदतीसाठी पुढाकार घेतला नाही. ही मुंबईकरांची बदललेली संस्कृती म्हणायची की ‘आपल्याला काय त्याचे!’ अशी निराकार वृत्ती?
– प्रवाशांसमोरच एसटी चालकाचे अपहरण
पुण्याहून एसटीची हिरकणी बस मुंबईला निघाली होती. रात्री मुंबईला येईपर्यंत अनेक प्रवासी बसमधून उतरले. या बसमध्ये वाहक नव्हता. मानखुर्दच्या शिवाजी नगर येथील टी जंक्शनवर रात्री नऊच्या सुमारास ही बस आली. तेव्हा बसने होंडा सिटी या गाडीला धडक दिली. त्यात गाडीचे थोडे नुकसान झाले. होंडा सिटीत विनोद डबले (२६) आणि मृत्युंजय गर्ग (२८) हे दोन तरुण होते. त्यांनी बसचालक माऊली भडगे (३०) याला शिवीगाळ करीत नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. पण भडगे यांच्याकडे पैसे नव्हते. या दोघांनी मग भडगे यांचे अपहरण करत त्यांना आपल्या होंडा सिटीत बसवून घेऊन गेले. हा सगळा प्रकार बसमधले प्रवासी निमूटपणे बघत होते. अपहरणकर्त्यांनी भडगे यांना नवी मुंबईत डबलेच्या घरी नेऊन डांबून ठेवले. रात्री २ वाजता भडगे यांचा भाऊ पुण्याहून १० हजार रुपये घेऊन आला मग त्या दोघांनी भडगे याची सुटका केली. पहाटे बसचालकाने पोलिसांत जाऊन तक्रार दिल्यानंतर या दोन अपहरणकर्त्यांना अटक झाली. बसमधील प्रवाशांच्या देखत या दोघांनी बसचालकाला आपल्या गाडीत बसवून नेले. पण कुणाही प्रवाशााला पोलिसांना कळवावेसे वाटले नाही. भडगे यांना अपहरणकर्ते घेऊन गेल्यानंतर हे प्रवासी शांतपणे बसमधून उतरून निघून गेले. भर रस्त्यातील मुख्य चौकात ही बस उभी होती. या प्रकरणात अपहरणकर्त्यांनी केवळ पैशांसाठी अपहरण केले होते. पण इतरही अनर्थ घडू शकला असता. बसमधील एकाही प्रवाशाने पोलिसांनी सांगितले नाही की मदतीसाठी पुढे आले नाही. जर कुणी अशी हिंमत दाखवली असती तर पुढचा अनर्थ टळला असता असे मानखुर्द पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत यांनी सांगितले.
– डोळ्यादेखत मित्राची हत्या
२९ मे रोजी वडाळ्याच्या प्रबुद्ध नगर येथील एका शिलाई कारखान्यात शहानवाज शेख (१६) आणि अमित कुमार (२२) या दोघांची ज्ञानसिंग ठाकूर या त्यांच्या सहकाऱ्याने चाकूने भोसकून हत्या केली. रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यावेळी चार तरुण कामगार कारखान्यात होते. आरोपी या दोघांना मारत होता तेव्हा हे चौघे मदतीसाठी आले नाही. त्यांनी जर आरोपीचा प्रतिकार केला असता किंवा कुणाला मदतीला बोलावले असते तर दोघांचे प्राण वाचले असते. विशेष म्हणजे खुनाचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपला गेला होता. घटनास्थळावरून पळून जाणाऱ्या आरोपी शहानवाजला नंतर बीट मार्शलने पाठलाग करुन पकडले.
– सर्वासमक्ष हत्या
३ मे रोजी वडाळ्याच्या विजय नगर येथे सुरेश सरोज (२५) या मोबाईल विक्रेत्याची पूर्ववैमनस्यातून हत्या झाली. जेव्हा हत्या झाली तेव्हा काही जण व्यायामशाळेतून परतत होते. त्यांच्या डोळ्यादेखत ही हत्या झाली. तर सरोजचा मित्र जवळच्याच दुकानात होता. हे सर्वजण त्याचवेळी मदतीसाठी गेले असते तर कदाचित सुरेशचे प्राण वाचले असते.
– भरवस्तीत हत्या
१५ एप्रिल रोजी अॅण्टॉप हिल येथे राजू सोनी (२७) या व्हिडिओ पार्लर चालविणाऱ्याची हत्या करण्यात आली. स्थानिक गुंड सोनीकडून हप्ता मागत होते. त्यावरून त्याचा वाद होता. १५ एप्रिल रोजी सकाळी चौघांनी त्याला घरातून बाहेर बोलावले आणि त्याची चाकूने भोसकून हत्या केली. पहाटेच्या वेळी अनेक जण नळावर पाणी भरण्यासाठी आले होते. पण कुणी पुढे आले नाही. जर या लोकांनी वेळीच मदत केली असती तर माझ्या भावाचे प्राण वाचले असते असे मयत राजू सोनीचा भाऊ फुलचंद याने सांगितले.
– जखमी निधी मदतीविना.
४ जून रोजी निधी पांडे (१७) या महाविद्यालयीन तरुणीचा बसच्या धडकेत मृत्यू झाला. दादरच्या खोदादाद सर्कल येथे ही दुर्घटना घडली. सुमारे २० मिनिटे ती घटनास्थळावर पडली होती, असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. तिला मदत मिळून रुग्णालयात नेण्यात आले तोपर्यंत खूप उशीर झाला होता. लोकांनी कसलीच वाट न बघता तात्काळ रुग्णालयात नेले असते तर कदाचित निधी वाचली असती, असे नातेवाईकांनी वाटते आहे.
लोकांना धोका पत्करायचा नसतो किंवा समोरच्या आरोपीच्या हातातील शस्त्र बघून िहमत होत नाही. पण अनेक जण एकत्र आले तर आरोपी काहीच करू शकत नाही. लोकांच्या संवेदनहीनतेमुळे गुन्हे वाढत असल्याचे यामुळे स्पष्ट होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा