शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी महापालिकेची आर्थिक स्थिती सक्षम होणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी मालमत्ता कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन महापौर प्रताप देशमुख यांनी केले.
येत्या काळात पाणीटंचाईची समस्या भीषण होणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा. आवश्यक बाबींसाठी काटकसरीने पाणी वापरावे, नळाला तोटी लावावी, असे देशमुख म्हणाले. शहर रस्ता दिवाबत्ती कंत्राट पद्धतीवर देखभाल दुरुस्तीची जबाबदारी देण्यात आली असून, दिवाबत्तीविषयी काही समस्या असतील तर कंत्राटदाराशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन त्यांनी केले.
पर्यावरणाचे संतुलन राखण्यास नागरिकांनी दरवर्षी किमान दोन रोपे लावून त्याचे जाणीवपूर्वक संवर्धन करावे. महापालिकेने आवडेल ते झाड योजना सुरू केली असून, ३ फूट उंचीची झाडे अत्यंत अल्प अनामतीवर नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यासाठी ९८८१६६६७९६ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
रोपटय़ाचे चांगल्या प्रकारे संगोपन झाल्यास अनामत रक्कम पुढील वर्षी परत करण्यात येईल, असे पत्रकात नमूद केले  आहे.