येथील तपस्या-सिद्धी कला अकादमीच्या वतीने ६ हजार ६६६ मुलींचे भव्य सामूहिक भरतनाटय़मचे सादरीकरण जानेवारी महिन्यात केले जाणार आहे. या उपक्रमाची नोंद ‘गिनीज बुक वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड’ यामध्ये केली जाणार आहे. या उपक्रमाचा संकल्प ६ ऑगस्ट रोजी शाहू स्मारक भवन येथे नृत्यगुरू पंडित टी. रवींद्र शर्मा यांच्या उपस्थितीत होणार आहे. ही माहिती उपक्रमाच्या संयोजक संयोगिता पाटील, सरला पाटील, शोभा पाटील, संजय भिडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.    
नृत्य संस्कार या नावाने होणाऱ्या उपक्रमाची माहिती देताना संयोगिता पाटील म्हणाल्या, १० वर्षांवरील शाळकरी मुलींना घेऊन त्यांना भरतनाटय़मचा इतिहास, आजचे महत्त्व याची माहिती देऊन त्याच्या सादरीकरणाची आवश्यकता याचे रीतसर शिक्षण दिले जाणार आहे. भरतनाटय़मचा हा पोशाख, दागिने, घुंगरू, केशरचना अशा पारंपरिक वेशभूषेमध्ये हे सादरीकरण होणार आहे. कोल्हापूरच्या वैभवी सांस्कृतिक परंपरेमध्ये हा ऐतिहासिक उपक्रम व्हावा असे आमचे प्रयत्न आहेत. या उपक्रमातील नृत्य कशाप्रकारचे करायचे, वेशभूषा-केशभूषा कशी करायची याची माहिती देणारी चित्रफीत सहभागी विद्यार्थिनींना दिली जाणार आहे. याकरिता काही शुल्क आकारले जाणार असले तरी प्रत्येक मुलीला सुमारे ४ हजार रुपयांचा किट दिला जाणार आहे. त्यामध्ये वेशभूषा, मेकअप याचे साहित्य असणार आहे.    
कार्यक्रमापूर्वी हेमामालिनी वा अन्य सेलिब्रेटींचा नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. स्थानिक प्रशिक्षण वर्गातील कलाकारांनाही या वेळी संधी दिली जाणार आहे. यापूर्वी मुंबई येथे ४ हजार ४२८ कलाकारांचा तर तैवान येथे ३ हजार ३०० कलाकारांचा सामूहिक नृत्याचा कार्यक्रम पार पडला होता. आमच्या उपक्रमामध्ये ६ हजार ६६६ मुलींचा सहभाग असणार आहे. संयोगिता पाटील यांनी यापूर्वी भरतनाटय़मच्या प्रसारासाठी न थांबता १३ तास व ६६ तास भरतनाटय़मचा कार्यक्रम केला होता.