खरिपाने अपेक्षित साथ दिली नाही. त्यामुळे रब्बी हंगामावर भरवसा ठेवून बसलेल्या शेतकऱ्यांवर पावसाने आधी कृपा व नंतर मात्र अवकृपा केली. परिणामी, रब्बी हंगाम चांगलाच अडचणीत आला आहे.
खरीप हंगामात जिल्हय़ातील काही तालुक्यांत अतिवृष्टी, तर काही तालुक्यांत पावसाने ताण दिला. परिणामी खरिपाचे पीक अडचणीत सापडले. खरिपाची कसर रब्बी हंगामात भरून निघेल, या आशेने शेतकऱ्यांनी रब्बीची वेळेवर पेरणी केली. पेरणीपूर्व पाऊस चांगल्या झाला. त्यामुळे रब्बी क्षेत्रातही चांगली वाढ झाली. हरभऱ्याचे क्षेत्र ८० हजार हेक्टरपेक्षा अधिक असून अजूनही पेरा वाढण्याची शक्यता आहे. परंतु सोमवारपासून पडणाऱ्या पावसामुळे रब्बी हरभरा पीक संकटात सापडले आहे. हरभरा हे कमी पावसात येणारे पीक. रोज पडणाऱ्या दवावरच हरभऱ्याची चांगली वाढ होते. या पिकाला जास्त पाऊस व ढगाळ हवामान सहन होत नाही. यंदा पेरणीच्या वेळी जमिनीत ओलावा जास्त असल्यामुळे ओलाव्यातून बुरशी वाढते, त्याचे प्रमाण १० टक्के होते. आता झालेल्या पावसामुळे बुरशीचे प्रमाण २५ टक्क्यांपेक्षा अधिक होऊन हरभरा पीक संकटात आल्याची भीती व्यक्त होत आहे.
जिल्हय़ात १ लाख १२ हजार ६६८ हेक्टरवर तुरीचे क्षेत्र आहे. तुरीचे जे पीक अजून फुलोऱ्यात व पक्व व्हायचे आहे, ते चांगलेच संकटात सापडले आहे. पावसामुळे फुलोरा गळून जातो. नंतर येणाऱ्या धुईमुळे रोगाचे प्रमाण प्रचंड वाढते. आठ दिवसांपूर्वी धुईच्या कचाटय़ात सापडलेल्या तुरी खराटय़ासारख्या झाल्या. आता पुन्हा पाऊस लागल्यामुळे होणाऱ्या धुईच्या माऱ्याचा प्रतिकार कसा करायचा? हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.
रब्बी ज्वारीचा पेराही दरवर्षी कमी होत आहे. ज्वारीला अतिशय कमी पाणी लागते. जास्त ओलावा झाल्यास बुरशी व मावा होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे ज्वारीचे पीकही हातचे जाणार आहे. गव्हाच्या पिकाला पाऊस मानवणारा असला तरी जमिनीत ओलावा किती आहे, त्यावर ताण सहन करण्याची क्षमता अवलंबून राहते. एकूण हातातोंडाशी येईल, अशी आशा रब्बीची होती. ती सुरू झालेल्या पावसाने मावळली आहे.
ढगाळ वातावरण आणखी दोन दिवस टिकेल, असे हवामानातील जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे सावट आहे. या स्थितीत कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना कोणत्या पिकावर कोणती फवारणी केली पाहिजे, याचे मार्गदर्शन होत असले तरी रोगाचा मारा अधिक व त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करण्यास मिळणारा अवधी कमी यामुळे पिके चांगलीच संकटात सापडली आहेत. हरभऱ्यावर बुरशीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढणार असल्यामुळे हरभऱ्याच्या बुडाला फवारणी पंपाचे नोजल काढून बाविस्टीन, तर तुरीवर िझक औषध फवारण्याची शिफारस कृषी विभागातर्फे करण्यात आली.

Story img Loader