उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून कोणत्याही चालकाला पक्का शिकाऊ परवाना हवा असेल तर त्या चालकाला प्रथम ऑनलाइन नोंदणीद्वारे उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे, असे कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेश सरक यांनी सांगितले.
आतापर्यंत शिकाऊ परवाना देण्यासाठी आरटीओ कार्यालयात अर्ज भरून देण्याची प्रक्रिया अवलंबली जात होती. यामुळे काही वेळा नागरिकांना कागदपत्रांची अपूर्णता, शिकाऊ चालकांची गर्दी यामुळे फे ऱ्या माराव्या लागत होत्या. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन नवीन दुचाकी, चारचाकी चालकाला शिकाऊ परवाना काढायचा असेल तर त्याने प्रथम आपल्या भागातील मोटार प्रशिक्षण केंद्रातून ऑनलाइन नोंदणी करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेत नवीन चालकाला आरटीओ कार्यालयात येण्यासाठी एक तारीख दिली जाते. आरटीओ कार्यालयात कागदपत्र छाननी, ऑनलाइन परीक्षा घेण्यात येऊन चालकाला शिकाऊ परवाना देण्यात येत आहे.
या धर्तीवर पक्का चालक परवाना मिळवण्यासाठी यापुढे चालकांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी लागेल. या पद्धतीचा अवलंब न करणाऱ्या नागरिकांना पक्का चालक परवाना आरटीओ कार्यालयातून देण्यात येणार नाही, असे राजेश सरक यांनी सांगितले. ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू. सारथी. एनआयसी.इन’ या संकेतस्थळावर याबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा