गेल्या नऊ वर्षांपासून सुरू असलेल्या सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता प्रकल्पातील कुर्ला येथील मध्य रेल्वेमार्गावरील पुलाच्या कामासाठी परवानगी मिळण्यात रेल्वेकडून दिरंगाई होत असून त्यामुळे या प्रकल्पाचे काम रखडले आहे. त्यामुळे ऑक्टोबर २०१३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या नियोजनाचा बोऱ्या वाजण्याची भीती आहे.
पश्चिम उपनगरातील लोकांना नवी मुंबई, पुण्याकडे जाण्यासाठी व पूर्व उपनगरांतील लोकांना विमानतळाकडे जाण्यासाठी सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. वाहनचालकांचा मोठा वळसा आणि वेळ यामुळे वाचणार असल्याने वर्षांला सुमारे ३०० कोटी रुपयांचे इंधन वाचेल, असा अंदाज आहे. या प्रकल्पासाठी सुमारे चार हजार घरांचे विस्थापन झाले व त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यातूनच हा प्रकल्प बराच रखडला. या प्रकल्पातील मोठा भाग रेल्वेच्या हद्दीतून जातो. त्याच्या परवानग्या मिळण्यातही बराच उशीर झाला. या रस्त्याच्या कामासाठी कुर्ला येथील मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरून लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत मध्य व हार्बर रेल्वेमार्गावरील उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. त्याची एकूण लांबी सुमारे सहाशे मीटर आहे.
डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेऊन त्या भागातील उड्डाणपुलासाठी गर्डर टाकण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे लवकर काम मार्गी लागणार असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, उड्डाणपुलाच्या मध्य रेल्वेच्या मार्गावरील टप्प्याचे काम करण्याची परवानगी अद्यापही मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेली नाही. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम रखडले असून प्रकल्पाच्या कामातील विलंब वाढत आहे. दरम्यान टिळक टर्मिनससाठी जोडरस्त्यापासून पोचमार्ग बांधून घेण्याची सूचना मध्य रेल्वेने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला केली आहे. सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता प्रकल्प ऑक्टोबर २०१३ पर्यंत पूर्ण करण्याचा प्राधिकरणाचा मानस आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावरील उड्डाणपुलासाठी गर्डर टाकण्याची परवानगी त्यासाठी आवश्यक आहे. महिनाभरात जरी ती परवानगी मिळाली तरी ऑक्टोबरचा मुहूर्त गाठता येईल. पण मध्य रेल्वेकडून परवानगी वेळेत मिळाली नाही तर प्रकल्प पूर्ण होण्यास आणखी विलंब होण्याची व खर्चातही वाढ होण्याची भीती आहे. आजवरच्या विलंबामुळे मूळचा १२० कोटींचा प्रकल्प खर्च आणखी १४० कोटी रुपयांनी वाढला आहे.