गोडय़ा, खाऱ्या तसेच शोभिवंत माशांची पैदास
राष्ट्रीय मत्स्यबीज विकास मंडळाने ठाणे जिल्ह्य़ातील मुरबाड आणि अंबरनाथ या दोन तालुक्यांमध्ये राज्यातील सर्वात मोठे मत्स्यालय तसेच मत्स्य उत्पादन केंद्र उभारण्यास मान्यता दिली असून अलीकडेच हैद्राबाद येथील मंडळाच्या कार्यालयात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत या प्रकल्पास हिरवा कंदील देण्यात आला. एकूण १८२ कोटी ७० लाख रुपयांच्या या प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर राज्यातील मत्स्य उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन वार्षिक ८४ हजार टन मत्स्य उत्पादन होऊ शकणार शकणार आहे. मासेमारी करणाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच खवैय्यांना किफायतशीर दरात उत्तम दर्जाचे मासे मिळावेत हा या प्रकल्पाचा मूळ उद्देश आहे.
पुरेसे जलसाठे असल्याने मुरबाड आणि अंबरनाथ येथे हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती स्थानिक आमदार आणि कोकण पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष किसन कथोरे यांनी ‘वृत्तान्तशी’ बोलताना दिली. दोन्ही तालुक्यातील बारवी, चिखलोली, भोज, मानिवली, खांडपे आदी दहा लहान-मोठय़ा धरणांमध्ये हे मत्स्य उत्पादन घेतले जाणार आहे. त्यासाठी तलावांमध्ये निरनिराळ्या आकारांचे एक हजार पिंजरे सोडण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे गोडय़ा पाण्याबरोबरच खाऱ्या पाण्यातील माशांची पैदासही या पिंजऱ्यांमध्ये केली जाणार आहे. त्याचप्रमाणे मोठय़ा प्रमाणात शोभिवंत माशांची निर्मितीही या प्रकल्पातून होणार आहे.
महाराष्ट्रात सध्या मागणीच्या तुलनेत अतिशय कमी म्हणजे माणशी सरासरी फक्त ५० ग्रॅम इतकेच मत्स्य उत्पादन होते. त्यामुळे अर्थातच मासे महाग आहेत. ठाणे जिल्ह्य़ातील या प्रकल्पामुळे राज्यातील मत्स्य व्यवसायास बळकटी मिळणार आहे. सध्या मत्स्य उत्पादनासाठी राज्यात अनेक ठिकाणी अनुकूल वातावरण असूनही मत्स्य शेतीबाबत उदासीनता दिसून येते. या प्रकल्पामुळे राज्यातील मत्स्य व्यावसायिकांना मूलभूत सुविधा तसेच प्रशिक्षण देता येणे शक्य होणार आहे. दोन तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पामुळे दोन हजार जणांना रोजगार मिळेल, असा विश्वास संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या दोन्ही तालुक्यांमधील तलावांमध्ये मत्स्य बीज संवर्धन करून त्याद्वारे कोकणातील जलाशयांमधील मत्स्य प्रजनन व्यवस्थेमध्ये वाढ केली जाणार आहे, तसेच मत्स्य उत्पादनात गुणात्मक वाढ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मत्स्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन
मत्स्य बीज उत्पादनाबरोबरच मत्स्य शेती करणाऱ्या राज्यातील लोकांना माती व पाणी अहवालाची माहिती पुरविणे, तांत्रिक बाबींविषयी मार्गदर्शन करणे आदी उपक्रमही प्रकल्पाद्वारे राबविण्यात येणार आहेत.
प्रक्रिया आणि साठवण
सध्या वाहतूक व्यवस्थेतील दोष आणि अपुऱ्या साठवण यंत्रणांमुळे बरेचसे मत्स्य उत्पादन नाश होते. या प्रकल्पात अत्याधुनिक पद्धतीचे मत्स्य साठवण केंद्र असणार आहे. तसेच माशांवर प्रक्रिया करण्याची उद्योगही राबविले जाणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा