मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम)चे पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवीसी यांच्या सभेस औरंगाबाद पोलिसांनी परवानगी नाकारली. प्रक्षोभक भाषणांमुळे चर्चेत असणाऱ्या ओवीसी यांच्या सभेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे कारण देत सभेस परवानगी नाकारण्यात आली. दरम्यान, पोलिसांच्या या परवानगी नाकारण्याच्या आदेशाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. उद्या (बुधवारी) यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
शहरातील तीन नगरसेवक या पक्षात प्रवेश करणार आहेत. या पाश्र्वभूमीवर ओवीसी ३१ जानेवारी व त्यानंतर दोन दिवस शहरात येणार असून, त्यांची जाहीर सभा ईदगाह मैदानावर आयोजित केली होती. पोलिसांकडे जाहीर सभेच्या परवानगीचे पत्र पाठविण्यात आले होते. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी परवानगी नाकारली.
नांदेड महापालिकेत या पक्षाने ११ जागा मिळविल्या. त्यानंतर एमआयएम पक्षाची चर्चा सर्वत्र सुरू झाली. औरंगाबादसह जालना, बीड व उस्मानाबाद येथून तरुणांनी पक्षप्रवेशासाठी संपर्क साधला होता. औरंगाबाद शहरातील तीन विधानसभा मतदारसंघात या पक्षाने नोंदणी सुरू केली असून, नगरसेवक जावेद कुरेशी समन्वयक म्हणून काम पाहात आहेत. उद्या न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर सभा होईल की नाही ते ठरेल, असे कुरेशी यांनी सांगितले. शहरात ओवीसी दोन दिवस मुक्कामी आहेत. ते कोणकोणत्या कार्यक्रमात सहभागी होतात, याची माहिती नंतर कळविली जाईल, असेही कुरेशी म्हणाले.

Story img Loader