महानगर पालिकेत अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, मुख्य लेखाधिकारी, सहायक संचालक नगररचना, कनिष्ठ अभियंता, तसेच लिपिक व सफाई कामगार, अशा विविध संवर्गातील ८८९ पदांच्या भरतीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजुरी दिली आहे. आयुक्त प्रकाश बोखड यांनी पद भरती संदर्भात मंत्रालयात सतत पाठपुरावा केल्यानंतर हे यश मिळाले आहे.
चंद्रपूर नगर पालिकेला महानगरपालिकेचा दर्जा मिळाल्यानंतर एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पद भरतीला मंजुरी मिळालेली राज्यातील एकमेव महानगरपालिका आहे.
महानगरपालिकेत विविध संवर्गातील नवीन १ हजार १९८ पदांच्या भरतीला तातडीने मंजुरी प्रदान करावी, असा प्रस्ताव आयुक्त प्रकाश बोखड यांनी वष्रेभरापूर्वी नगरविकास मंत्रलयाकडे पाठविला होता. मात्र तांत्रिक दोष समोर करून तीन वेळा हा प्रस्ताव रद्द केल्याने अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या बळावर महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेली कोटय़वधीची विकास कामे करतांना आयुक्त व सात अभियंत्यांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे. २५ ऑक्टोबर २०११ रोजी चंद्रपूर नगर पालिकेला महानगरपालिकेचा दर्जा देण्यात आला तेव्हापासून आयुक्त बोखड अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या बळावर रस्ते, पाणी, मलनिस्सारण, भूमिगत गटार, भूमिगत विद्युतीकरण, सिमेंट रस्ते, शौचालय व घरकुल बांधकाम यासोबतच इतर कामे करत आहेत. महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पडणारा अतिरिक्त भार लक्षात घेता आयुक्तांनी सातत्याने पाठपुरावा केल्यावर दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विविध संवर्गातील ८८९ पदांच्या भरतीला अंतिम मंजुरी दिली.
या पदांना मंजुरी देण्यात येत असल्याचे पत्र मुख्यमंत्रांनी आयुक्त बोखड यांच्या हाती दिले. मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेल्या पदांमध्ये अतिरिक्त आयुक्त १, उपायुक्तांचे दोन पदे, सहायक आयुक्त सात पदे, मुख्य लेखाधिकारी १, नगर सचिव १, वैद्यकीय अधिकारी आरोग्य १, वैद्यकीय अधिकारी स्वच्छता १, शहर अभियंता १, जलप्रदाय अभियंता १, सहायक संचालक नगररचना १, मुख्य अग्निशमन अधिकारी १, कनिष्ठ अभियंता व अभियंता यांची १५ पदे, कर संकलन अधिकारी १ या महत्वपूर्ण पदांसोबतच सफाई कुली, सफाई महिला कामगार व सफाई कामगार आदि पदांचा समावेश आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात   पद    भरतीला    मंजुरी   मिळाल्याने महानगरपालिका वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान, मंजूर पदांपैकी उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त, सहायक आयुक्त व मुख्य लेखा अधिकारी ही महत्वाची पदे येत्या तीन महिन्यात भरली जातील, अशी माहिती आयुक्त प्रकाश बोखड यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली. सध्या महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण असला तरी वष्रेभरात परिस्थिती पूर्णत: बदललेली राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा