राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारचे विविध घोटाळे, भ्रष्टाचाराला लोक कंटाळले आहेत. त्यामुळे सत्तेवर येणारे सरकार आता महायुतीचेच असणार आहे, असा विश्वास युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. तोंड वाजवून नव्हे तर तोंडात वाजवून न्याय मिळवा, असा ‘आदेश’ही त्यांनी उपस्थित युवा शिवसनिकांना दिला. दरम्यान, सभेत बेशिस्तीमुळे प्रचंड गोंधळ उडाला.
येथील महात्मा गांधी चौकात आदित्य ठाकरे यांची सोमवारी जाहीर सभा झाली. त्यांचे भाषण ऐकण्यास मोठी गर्दी जमली होती. व्यासपीठावर पक्षाचे सरचिटणीस अनिल देसाई, खासदार सुभाष वानखेडे, संपर्कप्रमुख सुहास सामंत, जि. प. अध्यक्षा मीनाक्षी बोंढारे, जिल्हाप्रमुख संतोष बांगर, माजी आमदार गजानन घुगे आदींची उपस्थिती होती.
ठाकरे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात, केवळ महाराष्ट्रातच नाही तर शिवसेना संपूर्ण देशात भगवा करणार आहे. हे करताना मध्ये येणाऱ्यांना तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असे बजावतानाच त्यांनी हातातील शिवबंधन दाखवून राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख भ्रष्ट काँग्रेस असा केला. राज्यात िहदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी मतदार, युवकांनी मोठय़ा संख्येने मतदान करण्याची गरज त्यांनी व्यक्त केले. भाषणात उपस्थितांना राज्यातील युवक व क्रीडा शिक्षण मंत्र्यांची नावे त्यांनी विचारली. मात्र, कोणालाच नाव सांगता आले नाही. त्यावर असे मंत्री समाजात जाऊन कामच करीत नसल्याने त्यांना ओळख मिळाली नसल्याचा टोला त्यांनी लगावला.
सभेत प्रचंड गोंधळ!
शिवसेनेच्या सभा अत्यंत शिस्तबद्ध म्हणून ओळखल्या जातात. मात्र, हा समज येथील सभेने खोटा ठरविला. सभा सुरू होण्यापूर्वी व नंतरही प्रचंड गोधळ झाल्याने खासदार वानखेडे, जिल्हाप्रमुख बांगर यांना वेळोवेळी हातवारे करून शिवसैनिकांना शांतता राखण्याचे आवाहन करावे लागत होते. सभेच्या डी पॉइंटपर्यंत उसळलेली गर्दी व थेट ठाकरे यांच्याजवळ उभे राहून फोटो काढून घेण्याची हौस युवा सनिकांनी भागविली. मात्र, त्यामुळे व्यासपीठावर प्रचंड गोंधळ उडाला. ठाकरे यांचे भाषण संपेपर्यंत गोंधळ सुरूच होता. अखेर ठाकरे यांना भाषण आटोपते घ्यावे लागले.

Story img Loader