औसा बाजार समितीच्या आवारातून जनावरांचा बाजार दुसरीकडे हटवावा, या मागणीसाठी तसेच पालिकेने आकारलेल्या मालमत्ता कराविरोधात गेल्या आठवडाभरापासून आडत असोसिएशनने बेमुदत बाजार बंद पुकारला. या पाश्र्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना व रघुनाथदादा पाटीलप्रणीत शेतकरी संघटना यांच्या वतीने बाजार समितीत तीन तास ठिय्या मांडून ताठर भूमिका घेण्यात आली. त्यापुढे आडत असोसिएशनने अखेर नमते घेत रविवारपासून (दि. २१) बाजार सुरू करण्याचे आश्वासन दिले. या घडामोडींमुळे औसा समितीतील बाजार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
औसा बाजार समितीत गेल्या ८-१० वर्षांपासून जनावरांचा बाजार भरत आहे. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून समितीला मोलाची मदत मिळाली. ग्रामीण भागातील बाजारपेठ म्हणून या बाजार समितीकडे पाहिले जाते. मालालाही लातूरच्या तुलनेत भाव मिळत असल्याने औशातील बाजारात धान्याची आवक वाढली आहे. याच बाजार समितीच्या आवारातील मोकळय़ा मैदानात जनावरांचा बाजार गुरुवारी भरतो, मात्र हा बाजार हटवावा व औसा पालिकेने आकारलेल्या वाढीव मालमत्ताकराविरोधात औसा आडत असोसिएशनने १२ एप्रिलपासून बेमुदत बंद पुकारला होता. बाजार समितीने बाजार सुरू करण्यास प्रयत्न केले. परंतु त्यास अपयश आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोरे, रघुनाथदादा पाटीलप्रणीत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी बंद बाजार सुरू करण्याबाबत निवेदन दिले व आश्वासनाशिवाय येथून हलणार नाही, अशी भूमिका घेतली. सभापती योगिराज पाटील आदींची या वेळी तीन तासांहून अधिक वेळ बैठक झाली. आडत असोसिएशन बाजार सुरू करीत नसल्यास त्यांचे परवाने रद्द करून नवीन परवाने द्यावेत, अशी ठाम भूमिका या वेळी शेतकरी संघटनेने घेतली. या भूमिकेनंतर मात्र आडत असोसिएशन नरमले. रविवारपासून आडत बाजार सुरू करण्याचे आश्वासन देऊन संप मिटला असल्याचे बैठकीत जाहीर केले.
औशात उद्यापासून पूर्ववत बाजार
औसा बाजार समितीच्या आवारातून जनावरांचा बाजार दुसरीकडे हटवावा, या मागणीसाठी तसेच पालिकेने आकारलेल्या मालमत्ता कराविरोधात गेल्या आठवडाभरापासून आडत असोसिएशनने बेमुदत बाजार बंद पुकारला.
First published on: 20-04-2013 at 12:51 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pet animal market restored from tomorrow in ausha