पनवेल एसटी डेपोमध्ये डिझेल पंपाच्या ठणाणाने सोमवारी प्रवाशांचे हाल झाले. लांब पल्ल्याच्या ३५ हून अधिक बसगाडय़ा येथे चार तासांच्या मुक्कामावर थांबल्याने येथे हजारो प्रवाशांचे हाल झाले. डिझेल संपणार याची माहिती असतानाही आगार व्यवस्थापकांनी नियोजन का नाही केले असा जाब येथे संतप्त प्रवासी विचारत होते. मात्र वाहक-चालकांव्यतिरिक्त येथे कोणासही याचे सोयरसुतक नव्हते. त्यामुळे पनवेल एसटी डेपोमध्ये सकाळी तणावाचे वातावरण होते.
पनवेल येथील एसटी डेपोमध्ये डिझेल भरण्यासाठी लांब पल्ल्याच्या बसेसना रांगा लावाव्या लागतात. त्यामुळे पनवेलचा प्रवास खोळंबा असे वृत्त याअगोदरच लोकसत्ताने प्रसिद्ध केले होते. प्रवाशांच्या या व्यथेचा प्रत्यय सोमवारी प्रवाशांना मोठय़ा प्रमाणात आला. रविवारी रात्रीपासून डेपोच्या पंपामध्ये डिझेल नसल्याने प्रवाशांना एसटी बदलून प्रवास करावा लागला. ज्या प्रवाशांनी तिकीट आरक्षण करून प्रवास सुरू केला होता. मात्र प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे प्रवाशांच्या नशिबी उभे राहून प्रवास करणे आले. काहींना तर दुसरी एसटी मिळताना दुपारचे बारा वाजले. पनवेलचे आगार व्यवस्थापक आर. जे. परदेशी यांनी नेहमीप्रमाणे कर्तव्यापासून हात वरती करत पाहतो, करतो, यात आपली चूक नसून ज्या इंडियन ऑईल कंपनीला व एसटी महामंडळाचे वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांना वारंवार कळवूनही त्यांनी डिझेल पाठविले नाही अशी उत्तरे देत प्रवाशांची बोळवण केली. रविवारी डिझेल संपणार हे माहीत असतानाही खोळंबा झालेल्या प्रवाशांचे सोयरसुतक नसल्याप्रमाणे सरकारी कामाची वेळ पाळत परदेशी हे सोमवारी सकाळी दहा वाजता कामावर हजर झाले. प्रवाशांचा रोष पाहून परदेशी थोडे बिथरले होते. प्रसंग बाका पाहून त्यांनी डेपोमध्ये उभ्या असलेल्या बसचे डिझेल काढून लांब पल्ल्याच्या बसला देतो अशी नवी शक्कल लढविली.
या सर्व बोळवणीच्या आणि एकमेकांवर आरोपांच्या राजकारणामध्ये सुमारे ३५ बसमधील प्रवासी आपले पुढील प्रवासाचे भवितव्य शोधत होते. अनेक प्रवासी लहान मुलांसह मुंबईहून गावी जाण्यासाठी निघाले होते. दिवाळसणातील पनवेलच्या डिझेल टंचाईमुळे हे प्रवासी एसटी महामंडळाच्या कारभाराविरोधात बोटे मोडत होते. अनेक प्रवासी व बसचालकांची हमरातुमरी यावेळी झाली. सोमवारी संतप्त प्रवाशांनी वाहक-चालकांना घेराव घातला. मात्र येथे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा