शहरातील प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजविण्याचे काम पाऊस थांबल्यानंतर युद्धपातळीवर सुरू होणे अपेक्षित असताना मंगळवारी स्थायी समिती सभापतींनी आधी खड्डे पाहणीचा कार्यक्रम राबवत प्रसिद्धीचा सोस पूर्ण करण्यात धन्यता मानली. अर्थात, त्यामागे महापौर व स्थायी सभापती यांच्यातील कुरघोडीचे राजकारण कारक असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत शहरातील सर्व खड्डे तातडीने बुजवावेत, असे निर्देश स्थायी सभापती अॅड. राहुल ढिकले यांनी दिले. पाणीकपातीचा निर्णय मागे घेण्याच्या विषयात स्थायी सभापती आणि महापौर यांच्यात कुरघोडीच्या राजकारणाचे दर्शन घडले होते. सर्वदूर पडलेल्या खड्डय़ांमुळे शहरवासीयांना मणक्यांचे विकार जडण्याचा धोका निर्माण झाला असताना पालिकेतील मनसबदार धावता दौरा करत ‘फोटोसेशन’ करण्यात मग्न होते.
मागील काही दिवसांत शहर व परिसरात मुसळधार पाऊस झाला. पहिल्या पावसात शहरातील बहुतांश रस्त्यांचे अंतरंग उघडे पडले. सद्य:स्थितीत शहरात असा एकही भाग नसावा की, तेथील रस्त्यांवर खड्डे पडलेले नाही. उन्हाळ्यात बडय़ा कंपनीच्या वाहिन्या टाकण्यासाठी अनेक रस्त्यांच्या एका बाजूला खोदकाम करण्यात आले. या ठिकाणी नंतर माती पसरविण्यात आली. सध्या हा भाग पावसामुळे चिखलमय झाला असताना दुसरीकडे रस्त्यांवर खड्डे असल्याने वाहनधारक दुहेरी कोंडीत सापडले आहेत. सलग आठ ते दहा दिवसांच्या संततधारेनंतर पावसाने विश्रांती घेतली. वास्तविक, पाऊस थांबल्यानंतर हे खड्डे बुजविण्याचे काम सुरू होणे क्रमप्राप्त होते. पण, शहरातील रस्त्यांवरील खड्डय़ांच्या विषयातही राजकारण करण्याची संधी सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकांनी सोडली नाही.
गंगापूर धरणात समाधानकारक जलसाठा झाल्यामुळे शहराची पाणीकपात रद्द करण्याची घोषणा याआधी स्थायी सभापतींनी केली होती. त्यानंतर महापौरांनी त्या संदर्भात निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. रस्त्यांवरील खड्डय़ांच्या प्रश्नात जवळपास असाच कित्ता गिरविला गेला. खड्डय़ांची दुरुस्ती सुरू करण्याआधी स्थायी सभापती ढिकले यांनी मंगळवारी पाहणी दौऱ्याचे आयोजन केले. पेठरोड, दिंडोरी, कॅनडा कॉर्नर, अशोकस्तंभ आदी भागांचा धावता पाहणी दौरा केला. सभापती येणार असल्याने पालिका कर्मचाऱ्यांनी उपरोक्त ठिकाणी खड्डे बुजविण्यासाठी जुजबी व्यवस्था केली होती. ढिकले महोदयांनी पाहणी केल्यावर खड्डा भरून घेतला जात असे. छायाचित्र टिपले की, की वाहनांचा ताफा खड्डेमय रस्त्यांवर पुढे मार्गस्थ होत होता. या पाहणीनंतर ढिकले यांनी पुढील दोन ते तीन दिवसांत रस्त्यांवरील सर्वच्या सर्व खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले.
खड्डे पाहणीचे ‘फोटोसेशन’
शहरातील प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजविण्याचे काम पाऊस थांबल्यानंतर युद्धपातळीवर सुरू होणे अपेक्षित असताना मंगळवारी स्थायी समिती सभापतींनी आधी खड्डे पाहणीचा कार्यक्रम राबवत प्रसिद्धीचा सोस पूर्ण करण्यात धन्यता मानली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-08-2014 at 08:57 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Photo session of potholes survey in nashik by yuva congress