सोलापूरच्या दयानंद कला व विज्ञान महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य तथा भौतिकशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. नागेश स्वानंद धायगुडे (वय ६४) यांचे गुरूवारी सकाळी पुण्यात मेंदूच्या विकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातच सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. वैशाली धायगुडे यांच्यासह विवाहित मुलगा व मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. विज्ञान, शिक्षणाबरोबरच विविध सामाजिक, पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. धायगुडे यांच्या निधनामुळे सोलापूरच्या शैक्षणिक व वैज्ञानिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील आपल्या मुलाच्या घरी वास्तव्यास असतानाच डॉ. धायगुडे यांना मेंदूचा विकार जडला. त्यामुळे त्यांना पुण्याच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. काल बुधवारी दुपारनंतर त्यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणाही झाली होती. परंतु गुरूवारी सकाळी पुन्हा प्रकृती बिघडली आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
डॉ. नागेश धायगुडे यांनी दयानंद महाविद्यालयात भौतिकशास्त्र विषयावर अनेक वर्षे अध्यापनाचे कार्य केले होते. ते काही वर्षे भौतिकशास्त्र विभागप्रमुखपदावर कार्यरत होते. प्राचार्य म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य करून स्वत:चा ठसा उमटविला होता. त्याचबरोबर समाजात वैज्ञानिक चळवळ विस्तारावी म्हणून त्यांनी विविध उपक्रम राबविले होते. विशेषत: मराठी विज्ञान परिषदेची सोलापूर शाखा स्थापन करण्यात त्यांचा महत्त्वाचा पुढाकार होता. अलीकडे सोलापूर विद्यापीठाजवळ पं. जवाहरलाल नेहरू विज्ञान केंद्र उभारण्यातही त्यांचा वाटा होता. प्राचार्यपदावरून निवृत्त झाल्यानंतर विज्ञानासह इतर विविध उपक्रम राबविण्यात त्यांची आग्रही भूमिका होती. त्यांच्या पत्नी डॉ. वैशाली धायगुडे यासुध्दा याच दयानंद महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करीत होत्या. विज्ञान व इतर उपक्रमांमध्ये धायगुडे दाम्पत्याचा सहभाग हमखास असायचा. रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्षपदाची धुरा डॉ. नागेश धायगुडे यांनी वाहिली होती.
रविवारी शोकसभा
डॉ. नागेश धायगुडे यांच्या निधनाबद्दल मराठी विज्ञान परिषदेच्या सोलापूर शाखेच्यावतीने येत्या रविवारी, ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता सरस्वती मंदिर कन्या प्रशालेत शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे अध्यक्ष डॉ. राजा ढेपे व डॉ. धायगुडे यांचे निकटवर्तीय क्रांतिवीर महिंद्रकर यांनी ही माहिती कळविली आहे.
भौतिकशास्त्राचे अभ्यासक डॉ. नागेश धायगुडे यांचे निधन
सोलापूरच्या दयानंद कला व विज्ञान महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य तथा भौतिकशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. नागेश स्वानंद धायगुडे (वय ६४) यांचे गुरूवारी सकाळी पुण्यात मेंदूच्या विकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातच सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
आणखी वाचा
First published on: 09-11-2012 at 04:50 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Physics expert nagesh dhaygude dead