केंद्र सरकारने लातूर शहरास अल्पसंख्याकबहुल शहर म्हणून घोषित केले. याअंतर्गत अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह आणि बहुलक्षेत्रीय विकास कार्यक्रमाची शहरात अंमलबजावणी करण्याबाबत जिल्हा प्रशासन व महापालिका उदासीन आहे. या पाश्र्वभूमीवर अल्पसंख्याक न्याय संघर्ष समितीच्या वतीने उद्या (मंगळवारी) महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
शहरातील मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन व जैन समाजातील सर्व संघटनांनी एकत्र येऊन अल्पसंख्याक न्याय संघर्ष समितीची स्थापना केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून विकास कार्यक्रमासाठी तीव्र जनआंदोलन उभारण्याचा निर्णय झाला. याचा भाग म्हणून या आंदोलनाचे आयोजन केले आहे. आंदोलनात अल्पसंख्याकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष काझी अब्दुल समद, मुर्तुजा खान, साबेर काझी, हाफीज अब्दुल जब्बार, इक्राम शेख, युवराज धसवाडीकर, किशोर जैन, सॅम्युअल सोनकांबळे, सलीम शेख आदींनी केले. धरणे आंदोलनास शिवसेनेनेही पािठबा दिला आहे.