अशोक पाटील खून प्रकरणातील आरोपींना अटक झाल्याने वस्तुस्थिती पुढे आली आहे. तरीही धनंजय महाडिक यांच्याकडून आपल्यावर गुन्हेगारांना पाठबळ देत असल्याचा आरोप होत आहे. खरेतर महाडिक हेच गेली ४० वर्षे दोन नंबर धंद्यामध्ये असून त्यांची कारकीर्द वादग्रस्त आहे. अशांकडून नार्को स्टेटची मागणी होत आहे. मात्र आपली प्रतिमा स्वच्छ असल्याने नार्को टेस्टच्या पुढचीही टेस्ट करण्याची तयारी आहे, असे मत गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकाव्दारे व्यक्त केले आहे.
भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांनी काल गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचा तीन खुनामध्ये सहभाग असल्याचा गंभीर आरोप करून त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, त्यांनी मंत्रिपदाचा व आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. त्याला प्रत्युत्तर देणारे पत्रक श्री. पाटील यांनी प्रसिध्दीस दिले आहे. त्यामध्ये महाडिक यांच्या अवैध धंद्यातील सहभागाचा पर्दाफाश केला आहे.
पत्रकात म्हटले आहे की, १९७९ साली टाकलेल्या छाप्यामध्ये माधवराव महाडिक यांचा सहभाग होता. ते महाडिक कोण, याचा खुलासा त्यांनी करावा. महाडिक यांच्या पेट्रोल पंपावर धाडी टाकण्यात आल्याने ते बंद आहेत. महाडिकांची कारकीर्द गुंडगिरी व दहशतीला पाठबळ देणारी आहे. २००९ च्या गणेशोत्सवात धनंजय महाडिक यांनी खून, सावकारी, मारामारी अशी प्रकारची कलमे लागू असलेली माणसे आमच्याकडे आहेत, त्याला आम्ही काय करणार असे सांगून आपण गुंडांच्या सेनेचे सेनापती आहोत, हे अप्रत्यक्षरीत्या कबूल केले होते. याचीच री ओढत महाडिक यांनी ११ गुन्हे नोंद असलेले अशोक पाटील आमच्या गटाचे प्रमुख कार्यकर्ते व मित्र होते म्हणून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात आलो होतो, हे वारंवार कबूल केले आहे. अशी माणसे आमच्याकडे आहेत व राजकारण करताना ती लागतात असेही पत्रकार परिषदेत महाडिक यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. याचाच अर्थ गुन्हेगारी व महाडिक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
महाडिक हे नेमके कोणत्या राजकीय पक्षात आहेत हे त्यांनी स्पष्ट करावे. शिवसेना, भाजपा, शेतकरी संघटना की मनसे अशा कोणत्या पक्षात ते आहेत, हे त्यांच्या कार्यकर्त्यांनासुध्दा माहीत नाही. ज्यांची राजकीय दिशा स्पष्ट नाही, ते लोकांना विचाराची दिशा काय देणार, असा प्रश्न उपस्थित करून सतेज पाटील यांनी आपल्या स्वच्छ प्रतिमेला छेद देण्यासाठी महाडिक कुटुंबीयांचा उपद्व्याप सुरू आहे. दररोज कोणत्याही विषयावर ते गप्पा मारत बसतील. पण मंत्रिपदाची जबाबदारी असल्याने त्यांच्या षड्यंत्रामध्ये मी अडकून पडणार नाही. यापुढे अशा घटनांबाबत काहीही स्पष्टीकरण देणार नाही, असे म्हणत मंत्री पाटील यांनी महाडिकांच्या या पुढील वक्तव्याची दखल घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा