मराठी चित्रपटसृष्टीत दरवर्षी ६०-७० चित्रपट प्रदर्शित होतात. मात्र काही चित्रपट तयार होऊनही केवळ पैसे नसल्यामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे डब्यांमध्ये पडून राहतात. मग अनेक महिने त्या चित्रपटांचे पुढे काहीच होत नाही. अशा चित्रपटांसाठी, त्यांच्या दिग्दर्शकांसाठी आणि निर्मात्यांसाठी ‘पिकल एण्टरटेन्मेण्ट’ने मदतीचा हात पुढे केला आहे. प्रदर्शनासाठी अडलेल्या या चित्रपटांना गुंतवणूकदारांच्या मदतीने पडद्यापर्यंत आणण्याची संकल्पना समीर दीक्षित यांनी सुरू केली असून काही महिने रखडलेला ‘माझी शाळा’ हा चित्रपट या माध्यमातून १४ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.  गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ वितरक म्हणून या क्षेत्रात वावरताना अनेक चित्रपट केवळ अपुऱ्या पैशांपायी फक्त डब्यातच पडून राहिले आहेत. यापैकी अनेक चित्रपट चांगले होते. मात्र निर्मात्यांना अधिक गुंतवणूक शक्य नसल्याने ते चित्रपट पडून राहिले. असे असताना दुसऱ्या बाजूला एक-दीड कोटी रुपये नव्या चित्रपटात गुंतवण्यास उत्सुक असलेले अनेक गुंतवणूकदारही आपल्या संपर्कात होते. या दोघांचा मेळ घालून देण्याचा विचार करूनच आपण ही नवीन संकल्पना रुजवत असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.  समीर दीक्षित यांच्या प्रयत्नांना यश आले असून डॉ. अतुल यादगिरे यांनी ‘माझी शाळा’ या काही महिन्यांपूर्वीच तयार झालेल्या आणि आता प्रसिद्धीच्या प्रतीक्षेत असलेल्या चित्रपटाच्या प्रस्तुतीची जबाबदारी घेतली आहे. यात गुंतवणूकदाराला कमीत कमी जोखीम पत्करावी लागते. मूळ निर्माता आणि गुंतवणूकदार यांच्यात लेखी करार केला जाईल. त्यानंतर सर्वप्रथम गुंतवणुकदाराने गुंतवलेले पैसे चित्रपटगृहांतील कमाई आणि सॅटेलाइट हक्कांतून वळते केले जाणार आहेत, असे दीक्षित म्हणाले.

Story img Loader