उत्तराखंडमधील केदारनाथ परिसरात यात्रेसाठी गेलेल्या जिल्हय़ातील ६० जणांपैकी ३० जण हे पंढरपुरातील असून ते यात्री सुखरूप आहेत. आपण आपत्ती व्यवस्थापन विभाग, मुंबई यांच्यामार्फत दिल्ली व उत्तराखंडचे अधिकारी यांच्याशी बुधवारी सकाळी संपर्क साधला असता हे सर्वजण वेगवेगळय़ा ठिकाणी आहेत असे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जिल्हा अधिकारी गेडाम हे पंढरपुरात यात्रा तयारी आणि विविध विकासकामे यांची पाहणी करण्यास आले होते. त्या वेळी ते विश्रामधाम येथे पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्यासमवेत तहसीलदार सचिन डोंगरे हे होते.
पंढरपूर येथील नंदकिशोर भट्टड यांच्या गणेश यात्रा कंपनीच्या माध्यमातून यात्रेकरिता गेले आहेत, असे संतोष कोंडेकर यांनी सांगितले.
पंढरपुरातील ३०, औरंगाबाद व सोलापूर जिल्हय़ातील ३० असे ६०जण आहेत. पंढरपुरातील ३० जणांनी आग्रा, बद्रिनाथ, गंगोत्री-जमनोत्री असे करून ते केदारनाथकडे निघाले अन् अतिवृष्टी झाली त्यामुळे त्यांना पुढे जाता आले नाही. १५ जून रोजी यातील काहीजणांशी संपर्कही झाला होता. जयप्रकाश कोंडेवार यांनी पंढरपूरला संपर्क करून येथे अतिवृष्टी आहे. सर्वजण सुखरूप आहेत. एवढाच निरोप दिला अन् संपर्क तुटला असे संतोष कोंडेवार यांनी सांगितले.
या प्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले, की आपण उत्तराखंड, दिल्ली येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रवासी सुखरूप आहेत अशी माहिती दिली.

Story img Loader