वीज वितरण कंपनीने ग्राहकांना सुविधा देण्याच्या दृष्टीने उपविभागीय स्तरावर वेगवेगळे विभाग करून हा उपक्रम ‘पायलट प्रोजेक्ट’च्या या नावाने सुरू केला होता. वीज वितरण कंपनीने ग्राहकांची समस्या दूर होईल, या हेतूने चार महिन्यांपूर्वी या प्रोजेक्टला सुरुवात केली होती, मात्र या प्रोजेक्टमुळे वीज ग्राहकांच्या समस्या कमी होण्याऐवजी त्यात वाढ झाल्याने अखेर वीज वितरण कंपनीने हा प्रोजेक्ट काही काळापुरता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महावितरण सुरू केलेल्या पायलट प्रोजेक्टला चार महिन्यातच बंद करण्याची पाळी आली आहे.
वीज वितरण कंपनीने चार महिन्यांपूर्वी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामात सुधारणा करण्यासाठी वीज वितरण कंपनीने वेगवेगळे विभाग तयार करून वीज ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला. यासाठी गुणवत्ता नियत्रंण, ग्राहक सुविधा केंद्र, वसुली विभाग, देखभाल दुरुस्ती विभाग, ग्राहक तक्रार विभाग, असे पाच स्वतंत्र विभाग स्थापन केले होते. तसेच या पायलट प्रोजेक्टची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती.
पायलट प्रोजेक्टनुसार शहरातील कुठल्याही भागातील वीज ग्राहकाला वीज समस्येसंबंधी कुठलीही तक्रार असल्यास त्यांना सूर्याटोला येथे तक्रारींची नोंद करावी लागत होती. शहरातील वीज पुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत करण्याकरिता अन्य कुठल्याही अधिकाऱ्यांना तक्रार न करता ग्राहक सुविधा केंद्रात यासंबंधीची तक्रार केल्यानंतर याची दखल घेतली जात होती, तसेच थकित वीज देयकांची वसुली करण्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला होता. त्यामुळे थकित वसुलीतही चांगलीच वाढ झाली होती.
या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत गोंदिया शहर उपविभागात पाच केंद्र सुरू करण्यात आले होते. नवीन वीज कनेक्शन, फ्युज गेल्याची तक्रार व अन्य समस्यांकरिता एका टोकावरील वीज ग्राहकाला सूर्याटोला केंद्रावर जाऊन तक्रार नोंदवावी लागत होती, मात्र ग्राहक सुविधा केंद्रात ग्राहकांनी तक्रार नोंदवल्यानंतर त्यांच्या तक्रारीची लगेच दखल घेतली जात नव्हती. शिवाय, या केंद्रावर कामाच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने ग्राहकांच्या समस्या मार्गी लावताना कर्मचाऱ्यांवरील ताणही वाढला होता. त्यात गेल्या महिनाभरापासून शहरातील वीज पुरवठा वांरवार खंडित होण्याच्या तक्रारीतही वाढ झाली होती. शहरातील काही भागातील वीज पुरवठा एक एक दिवस खंडित राहत होता.
तसेच याची तक्रार ग्राहकांनी ग्राहक तक्रार निवारण केंद्रात केल्यानंतर बरेचदा त्याची दखल घेतली जात नव्हती, तर बहुतेक वेळा या केंद्रातील दूरध्वनी बंद राहायचे, त्यामुळे ग्राहकांच्या समस्येत चांगलीच वाढ झाली होती.
वाढत्या विजेच्या समस्येमुळे ग्राहकांचा वीज वितरण कंपनी विरोधात रोष वाढत होता. विशेष म्हणजे, वीज वितरण कंपनीने विभागीय स्तरावर वेगवेगळे विभाग तयार करून ग्राहकांच्या समस्या दूर करण्यासाठी हा पायलट प्रोजेक्ट सुरू केला होता, मात्र या प्रोजेक्टमुळे ग्राहकांच्या समस्येत वाढ झाल्याने हा पायलट प्रोजेक्ट काही काळापुरता बंद करण्याची पाळी वीज वितरण कंपनीवर आली आहे.
तसेच कालपासून हा पायलट प्रोजेक्ट काही काळापुरता बंद करण्यात येत असल्याचे वीज वितरण कंपनीने जाहीर केले. त्यामुळे केवळ चार महिन्यांच्या कालावधीत वीज वितरण कंपनीच्या या पायलट प्रोजेक्टचा फज्जा उडाला आहे.
ग्राहक व वीज कर्मचाऱ्यांच्या होत असलेल्या त्रासामुळे सुरू करण्यात आलेला हा पायलट प्रोजेक्ट संपुष्टात आणण्यात आल्याची माहिती गोंदिया महावितरणचे अधीक्षक अभियंता अशोक फुलकर यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा