मूल होत नसल्याने मी बाळ पळवल्याची कबुली देणाऱ्या ‘त्या’ आरोपी महिलेने शुक्रवारी आणखी धक्कादायक खुलासा केला. मूल पळवण्याच्या यापूर्वी झालेल्या घटना, त्याच्या पेपरला आलेल्या बातम्या व टीव्हीवरून होणाऱ्या प्रसारणाची चर्चा मी ऐकली होती. त्यातून आपणही मूल पळवावे, अशी कल्पना सुचली व बऱ्याच दिवसांच्या पाहणीनंतर तशी कृती केल्याचे तिने सांगताच सर्वानाच धक्का बसला.
जरीना ऊर्फ आसमा हरिष कांबळे (वय-४०, रा. काटेवस्ती, किवळे) असे या प्रकरणी अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. मूळची कर्नाटकची असलेल्या आसमाचा हरीष हा दुसरा नवरा आहे. १९८७ मध्ये पहिल्या लग्नानंतर ती देहूरोडला राहण्यास आली होती. तीन मुले झाल्यानंतर पहिला पती काविळीने मरण पावला. त्यानंतर तिने हरीषबरोबर दुसरे लग्न केले. मात्र, मूल होत नसल्याने यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून बाळ पळवल्याचे तिने सांगितले. शुक्रवारी सायंकाळी तिला पोलीस उपायुक्त कार्यालयात आणले होते. तेव्हा उपायुक्त शहाजी उमप, सहायक पोलीस आयुक्त सुधीर चौगुले, पोलीस निरीक्षक मोहन विधाते यांच्या साक्षीने तिने ही माहिती पत्रकारांना दिली.
तपासासाठी पोलिसांनी चार पथके केली होती. सीसीटीव्ही फुटेज व त्या महिलेचे फोटो सगळीकडे पाठवण्यात आले. वेबसाईट व फेसबुकवरही अपलोड करण्यात आले. त्यातून एका नागरिकाने या महिलेला पाहिल्याची माहिती कळवली. त्यानुसार शोध घेत त्या महिलेपर्यंत पोलीस पोहोचले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आसमाने नंतर मात्र गुन्ह्य़ाची कबुली दिली, असे यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, मूल शोधल्याबद्दल गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दूरध्वनीवरून पोलीस उपायुक्त शहाजी उमप व पोलीस निरीक्षक मोहन विधाते यांचे कौतुक केले. तसेच, तपास करणाऱ्या पथकास दहा हजार रुपयांचे रोख बक्षीसही जाहीर केले.    

Story img Loader