नागपूरला दोन तर, दिल्लीत तीन दिवसांचा ‘तळ’
िपपरी महापालिकेच्या संरक्षण खात्याशी संबंधित प्रश्नांसाठी दिल्लीतील बैठकीसाठी गेलेले आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी तेथे पुरते अडकले आहेत. केंद्रीय संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅन्टोनी व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी सादरीकरण झाले. मात्र, ठोस निर्णय न झाल्याने गुरुवारी पुन्हा बैठक झाली. त्यातही चर्चा अपूर्ण राहिल्याने शुक्रवारी तिसऱ्या दिवशी पुन्हा बैठक लावण्यात आली आहे. नागपूर अधिवेशनासाठी दोन दिवस थांबावे लागल्यानंतर आयुक्तांना दिल्लीत तीन दिवस तळ ठोकावा लागल्याने पालिकेतील त्यांच्या कामांचे व बैठकांचे नियोजन कोलमडले आहे.
संरक्षण खाते व महापालिकेतील जागांची हद्द तसेच मालकीचा तिढा वर्षांनुवर्षे कायम असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार यांच्या पुढाकाराने दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी आमदार विलास लांडे, महापौर मोहिनी लांडे, आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी, पक्षनेत्या मंगला कदम, सहशहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, नगररचना उपसंचालक प्रतिभा भदाणे व संरक्षण खात्याचे उच्चस्तरीय अधिकारी यांच्या उपस्थितीत  सादरीकरण व सविस्तर चर्चा झाली. संरक्षण खात्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे तेव्हा सांगण्यात आले. त्यानंतर, गुरुवारी होणाऱ्या पालिका सभेसाठी उपस्थित राहण्यासाठी महापौर, पक्षनेत्या शहरात परतल्या. उर्वरित चर्चेसाठी आयुक्तांना मात्र थांबावे लागले. संरक्षण खात्याचे राज्यमंत्री व दोन सचिवांच्या उपस्थितीत गुरुवारी दुसऱ्या दिवशीही चर्चा झाली, मात्र तेव्हा चर्चा अपूर्णच राहिल्याने शुक्रवारी तिसऱ्या दिवशी पवार व संरक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुन्हा बैठक होणार असून त्यासाठी आयुक्तांना थांबावे लागले आहे.  नागपूर अधिवेशनात पालिकेच्या प्रश्नांसाठी आयुक्तांना तेथे जावे लागले होते. तेथे दोन दिवस गेले. त्याच ठिकाणी दिल्लीतील आयुक्तांना दिल्लीच्या बैठकीचे निमंत्रण आल्याचे समजले. त्यामुळे ते दिल्लीला रवाना झाले. बैठक व अन्य चर्चा एकाच दिवसात होईल, असे गृहीत धरून आयुक्तांनी पुढील नियोजन केले व त्यांची पुरती अडचण झाली. सलग पाच दिवस ते बाहेरच असल्याने त्यांनी लावलेल्या बैठका व कामांचे वेळापत्रक कोलमडले आहे. मात्र, दोन्हीकडे त्यांची उपस्थिती अनिवार्य असल्याने त्यांचा नाईलाज झाला असल्याचे दिसते.    

Story img Loader