महापौरांच्या मोटारीची तपासणी; अधिकारी व नगरसेवकांच्या मोटारींना दंड
गडद काळ्या काचा असलेल्या ६० मोटारींवर िपपरी वाहतूक पोलिसांनी गुरुवारी कारवाई केली. महापौरांच्या लाल दिव्याच्या मोटारीच्या काचांची तपासणी करतानाच शिक्षण मंडळ सभापती, अधिकारी व नगरसेवकांच्या मोटारचालकांकडून दंड वसूल करण्यात आला. या आठवडय़ात जवळपास ५०० मोटारींवर कारवाई करून पाच लाख
रुपयांपर्यंत दंड वसुली केल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक संजय नाईक पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सुनील वायदंडे यांच्या पथकाने गुरुवारी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कारवाई केली. पालिकेत जाणाऱ्या मोटारी थांबवून त्यांच्या काचा तपासण्यात आल्या. यावेळी महापौरांना आणण्यासाठी निघालेली मोटार पोलिसांनी अडवली. काचांची तपासणी केली, चालकाचा परवानाही पाहण्यात आला. या मोटारीच्या काचा यापूर्वीच बदलण्यात आल्याचे दिसून आले. त्यानंतरही तपासणी सुरू असल्याचे पाहून पोलीस अधिकाऱ्यांनी महापौरांची मोटार सोडून देण्याची सूचना केली.
मात्र, अनेक नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या मोटारी पालिकेत आल्या. त्यापैकी गडद काचा असणाऱ्या मोटारचालकांकडून दंड वसूल करण्यात आला.
निरीक्षक संजय नाईक पाटील म्हणाले, गडद काचा लावण्यास बंदी आहे. यासंदर्भात अनेकदा आवाहन केले असून आता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत ५०० मोटारींवर कारवाई केली असून यापुढेही मोहीम सुरूच राहणार
आहे.  गुरुवारी मुख्यालयात जाणाऱ्या गाडय़ांवर कारवाई केली. महापौरांच्या गाडीची तपासणी करण्यात आली. मात्र, दंड करण्यात आला नाही. अन्य चालकांकडून दंडवसुली करण्यात आली. यापुढेही मोहीम सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri police takes the action on black mirror vans
Show comments