शहरातील थोबडे वस्ती येथे राहणाऱ्या आपल्या मावशीच्या घरातून साडे तीन लाखांची रोकड आणि ६३ ग्रॅम सोने असा सुमारे पाच लाखांचा ऐवज लंपास करणाऱ्या भाच्यासह चौघा जणांविरुध्द फिर्याद सलगर वस्ती पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
ललिता आप्पाराव मस्के या थोबडे वस्तीत राहतात. त्यांचा भाच्चा अखलेश विष्णू नलावडे हा त्याच भागात राहतो. तो अधुनमधून मावशीच्या घरी जात असे. त्याने आपले साथीदार राजकुमार सिद्राम नागणे, भामाबाई सिद्राम नागणे व महंमद बशीर शेख (रा. थोबडे वस्ती) यांच्या मदतीने मावशी ललिता यांच्या घरातून साडेतीन लाखांची रोकड तसेच ५० ग्रॅम सोन्याच्या पाटल्या, १० ग्रॅम सोन्याची बोरमाळ आणि इतर ऐवज असा मिळून सुमारे पाच लाखांचा ऐवज चोरुन नेला. ललिता मस्के यांनी मागणी करुनही सदर चोरुन नेलेला ऐवज परत न केल्यामुळे अखेर पोलिसात धाव घेण्यात आली.
पत्नीचा खून
दारुचे व्यसन जडलेल्या पतीला दारु सोडून कामधंदा करा म्हणून विनवणी केल्याचा राग मनात धरुन पतीने आपल्या पत्नीचे डोके िभतीवर आपटून तिचा खून केल्याचे घटना माढा तालुक्यातील कुर्डू येथे घडली. आशा गणेश मोरे (वय ३४) असे खून झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. तिचा पती गणेश भागवत मोरे याच्याविरुध्द कुर्डूवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जोडप्याने लांबविले ११ मोबाईल
शहरातील गोल्डिफच पेठेत सिटी प्राईड मोबाईल शॉपीमधून एका जोडप्याने ११ मोबाईल संच हातोहात लंपास केल्याची बाब उघडकीस आली आहे. हे जोडपे दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाले आहे. कैलास मिठालाल कोठारी यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या दुकानात इलेक्ट्रिक बल्ब खरेदी करण्याचा बहाणा करुन एक जोडपे आले. कोठारी यांची नजर चुकवून या जोडप्याने मोबाईल संच चोरुन नेल्याचे सीसीटीव्हीच्या माध्यमातून दिसून आले.

Story img Loader